फक्त 1200 रू. च्या लाचेसाठी पुरवठा निरीक्षक व संगणक चालक अँटी करप्शनच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested
फक्त 1200 रू. च्या लाचेसाठी पुरवठा निरीक्षक व संगणक चालक अँटी करप्शनच्या जाळ्यात

फक्त 1200 रू. च्या लाचेसाठी पुरवठा निरीक्षक व संगणक चालक अँटी करप्शनच्या जाळ्यात

मंगळवेढा - स्वस्त धान्याकरिता भराव्या लागणाऱ्या चलनासाठी 1200 रू. लाचेची मागणी करून पुरवठा निरीक्षकासह संगणक चालकास लाच स्वीकारताना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात तहसील कार्यालयात खळबळ उडाली.

या प्रकरणात पोलिसात पुरवठा निरीक्षक उत्तम वामन गायकवाड व संगणक चालक बालाजी सिद्धेश्वर यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिलेल्या माहितीनुसार शहरातील वडर गल्ली येथील स्वस्त धान्य दुकानदार यांना स्वस्त धान्यासाठी लागणाऱ्या मालाचे मासिक चलन शासकीय गोदाम मंगळवेढा येथे चलनाद्वारे भरावे लागते. मे 2022 च्या धान्याचे चलन काढून देण्यासाठी चलनाच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी 250 रुपये व साहेबाच्या नावे 1200 रुपये अशी रक्कम मासिक हप्ता म्हणून द्यावे लागतील, अशी मागणी संगणक चालक बालाजी सिद्धेश्वर यादव यांनी केली.

तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जानुसार 12 मे ते 26 मे दरम्यान दोन्ही आरोपीवर पडताळणी कारवाई करण्यात आली. त्यामध्ये बालाजी यादव यांनी वरील रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. 26 मे रोजी लाचलुचपत पथकाने याबाबत सापळा लावला असता पुरवठा निरीक्षक निरीक्षक यांनी व रक्कम संगणक चालक बालाजी यादव यांच्याकडे देण्यास सांगितले. व सदर रक्कम स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

मंगळवेढा तहसील कार्यालयाच्या सर्वच विभागात ग्रामीण भागातून येणार्‍या नागरिकांना विविध कामासाठी पैशासाठी अडवणूक केली जात आहे. त्यामध्ये शेतकरी सन्मान योजना, पुरवठा विभाग, नवीन श्रावणबाळ, संजय गांधी योजनेच्या प्रकरणासाठी हेलपाट्याचा नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे नागरिकातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. पुरवठा विभागात नवीन शिधापत्रिका काढणे व बंद शिधापत्रिका ऑनलाईन करण्यासाठी ग्रामीण भागातून कार्ड हेलपाटे मारून त्रस्त झाले. मात्र, पुरवठा विभाग यांना कार्डधारकांना समाधानकारक सेवा देण्यात कमी पडला. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठा विभागाच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी नागरिकांना लाचलुचपत पथकाकडे जावे लागल्याची भावना या घटनेनंतर बोलताना व्यक्त केली.