Pandharpur : कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध; युवराज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध; युवराज पाटील

कारखाना भाडेतत्वावर देण्यास विरोध; युवराज पाटील

पंढरपूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी, कामगार आणि कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. याला सर्वस्वी कारखान्याचे सध्याचे अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहेत, अशी टीका विठ्ठलचे संचालक युवराज पाटील यांनी भगिरथ भालके यांच्यावर केली. विठ्ठल कारखाना भाडेतत्वावर देण्यास आमचा विरोध असून हा कारखाना शेवटपर्यंत सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, यासाठी रस्त्यावर देखील उतरु असा इशारा ही श्री. पाटील दिला.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबर पाटील यांच्या ९८ व्या जयंतीच्या निमित्ताने येथील विठ्ठल हॉस्पिटलमध्ये सर्व रोग निदान शिबीर व शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विठ्ठलच्या दुरावस्थेला सर्वस्वी भालके जबाबदार असल्याचा सर्वच नेत्यांनी व विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांनी ठपका ठेवला. यावेळी युवराज पाटील यांनीही विठ्ठल कारखाना हा सभासदांच्या मालिकाचा आहे, तो कायम त्यांच्याच मालकीचा राहिला पाहिजे, अशी भूमिका घेतली.

पंढरपूर तालुक्‍याचे वैभव असलेला विठ्ठल साखर कारखाना गैरकारभारामुळे बंद पडला आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी मध्यंतरी प्रयत्न केले होते. परंतु, कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके व त्यांच्या काही संचालक सहकाऱ्यांनी युवराज पाटील यांना विरोध केला. त्यानंतर संचालक मंडळातील अंतर्गत कलह अधिक वाढला. त्यानंतर आज कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी शेतकरी मेळाव्यातून भगिरथ भालके यांना थेट आव्हान देत, कारखानाच्या आजच्या दुरावस्थेला भालकेच जबाबदार असल्याचा आरोप देखील केला.

मेळाव्याला धाराशिव साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, मोहन उपासे, रावसाहेब चव्हाण, राजेंद्र पाटील, बाळासाहेब पाटील, तात्या निकम, श्रीमंत देशमुख, एकनाथ हांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, माजी तालुका अध्यक्ष दीपक पवार, दिनकर चव्हाण. विलास साळुंखे, राष्ट्रवादीचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील जगताप आदीसह शेतकरी व सभासद मोठ्या संख्याने उपस्थित होते.

loading image
go to top