डोंगराच्या कपारीतील गळोरगी तलाव ओव्हरफ्लो ! फुलपाखरू पार्क, पक्षी निरीक्षण केंद्र, बोटिंग आदी सुधारणांना वाव 

Galorgi Lake.
Galorgi Lake.

अक्कलकोट (सोलापूर) : गळोरगी (ता. अक्कलकोट) हे अक्कलकोट शहरापासून आठ किलोमीटर अंतराचे गाव. त्या ठिकाणचा 2.08 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असणारा तलाव मागील चार दिवसांपासून ओव्हरफ्लो झाला आहे. आता त्याच्या सांडव्यावरून पाणी वाहताना दिसत आहे. तलावाच्या चारही भागाला डोंगराळ भाग आणि मध्यभागी असणारा तलाव परिसर नैसर्गिक व प्राकृतिक सौंदर्याने नटलेला आहे. 

पर्यटन विभागाने करावा विकास 
अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरात दररोज हजारो भाविक सतत दर्शनास येत असतात. कोरोना काळानंतर ज्या वेळी पुन्हा अक्कलकोट तालुक्‍यातील पर्यटन बहरेल, त्या वेळी गळोरगी तलाव परिसरात फुलपाखरू पार्क, पक्षी निरीक्षण केंद्र, बोटिंग तसेच कृषी पर्यटन आदी गोष्टींच्या सुधारणांना मोठा वाव असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने या ठिकाणी या सोयी उपलब्ध करून दिल्यास या भागाच्या विकासासाठी मोठे योगदान लाभणार आहे. तरी या तलाव परिसराचा कायापालट करून सौंदर्यात भर पडेल असे काम होण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

पर्यटनस्थळ म्हणून विकसित झाल्यास रोजगाराची मुबलक संधी 
गेल्या वर्षी उन्हाळ्यात तलाव पूर्ण कोरडा पडला होता. त्या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सूचनेनुसार अनुलोम संस्थेकडून जेसीबी व पोकलेन देण्यात आले होते तर शासनाकडून डिझेल देण्यात आले होते. तर शेतकरी वर्गाकडून स्वतःच्या वाहनाने प्रचंड गाळ काढण्यात आला होता. नागरिकांनी सुमारे वीस किलोमीटरपर्यंत गाळ नेऊन टाकला होता. त्या वेळी तीन लाख ब्रास गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे सहा कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. आतासुद्धा तलाव भरून वाहत आहे. यामुळे या भागात रोजगार उपलब्ध होण्यासाठी आणि देश-विदेशातून आलेल्या भाविकांना विरंगुळा होईल अशी सोय उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. 

या तलाव परिसरात चातक, किंगफिशर, हळदीकुंकू बदक, राजहंस, पट्टकदंब, ग्रीन बी इटर, चित्रबलाक, हुडहुड यांसह शेकडो पक्षी तर आकर्षक रंगीबेरंगी अनेक प्रकारचे फुलपाखरू या ठिकाणी आढळतात, त्यामुळे इथे फुलपाखरू पार्क, पक्षी निरीक्षण केंद्र तसेच विस्तीर्ण पाण्यामुळे बोटिंगची सोय होऊ शकते. यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

याबाबत बासलेगावचे प्रगतशील शेतकरी एजाज मुतवल्ली म्हणाले, मी अक्कलकोट शहरात हॉटेल व निवास व्यवस्था सुरू करणार आहे. त्या जोडीस माझे गळोरगी येथील तलावालगत असलेल्या 22 एकर क्षेत्रात कृषी पर्यटन केंद्र सुरू करणार आहे, ज्यात वनभोजन, वनविहार, निवास व्यवस्था, हुरडा पार्टी, बैलगाडी सफर, फळबागा व पीक माहिती देणे, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आदी कामांचे नियोजन सुरू केले आहे. यासाठी गळोरगी तलाव परिसराचा विकास होणे गरजेचे आहे. 

अनुलोम भाग जनसेवक राजकुमार झिंगाडे म्हणाले, अनुलोम संस्थेच्या माध्यमातून उन्हाळ्यात तीन महिने सतत गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यात आली आहे, ज्यात तीन लाख ब्रास गाळ निघून सहा कोटी लिटर पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांची पाण्याची चांगली सोय झाली आहे. या भागाचा आणखी विकास होण्यासाठी येथे पर्यटन विकास केंद्र होणे आवश्‍यक आहे, ज्यात फुलपाखरू पार्क, बोटिंग आदींचा समावेश असेल. 

गळोरगीचे शेतकरी मनोज काटगाव म्हणाले, माझे तलावलगत चार एकर शेती आहे. या तलावाचा पर्यटन खात्यातून विकास केल्यास पर्यटकांना मेजवानी ठरणार आहे. मीही या ठिकाणी कृषी पर्यटनपूरक व्यवसाय सुरू करणार आहे, ज्यात हुरडा पार्टी, वनभोजन आदींची सोय असणार आहे. या भागात वड, पिंपळ आदी वृक्षांची रोपे लावावीत तसेच तलाव परिसरातील चिलार वगैरे काढून स्वच्छता ठेवावी म्हणजे पक्षी व फुलपाखरे यांचा वावर आणखी वाढेल. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com