esakal | Solapur: पंचनाम्यासाठी 65 मिली मीटरचा पावसाचा नियम शेतकऱ्यांच्या मुळावर
sakal

बोलून बातमी शोधा

Barshi taluka
बार्शी तालुक्यात १० पैकी ६ मंडलांचे पंचनामे सुरू झाले आहेत

पंचनाम्यासाठी 65 मिली मीटरचा पावसाचा नियम शेतकऱ्यांच्या मुळावर

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

वैराग (सोलापूर): बार्शी तालुक्यात १० पैकी ६ मंडलांचे पंचनामे सुरू झाले आहेत. मात्र उर्वरित चार मंडळातील नुकसानीच्या पंचनाम्यासाठी महसूल व शासनाचा ६५ मिली मीटरचा पावसाचा नियम अडसर ठरत असल्याने शेतकरी आक्रमक व संतप्त झाले आहेत. पंचनाम्याच्या मागणीमुळे तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील शासनाकडे आपल्या स्तरावर पंचनाम्याची मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा: वैराग येथे ऑनलाईन हेल्पलाईनला प्रारंभ !

बार्शी तालुक्यात पडणाऱ्या सरासरी पावसापेक्षा दीडपट अधिक पाऊस पडून देखील १३७ गावांपैकी ४६ गावांना पंचनाम्यातून वगळण्यात आल्याने या वैराग, सुर्डी, नारी, खांडवी या चार मंडलातील शेतकरी संतप्त झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून बार्शी तालुक्यात पाऊस पडत असून धरणे, पाझरतलाव, विहिरी, गाव तळे सर्व भरले असून वाहत आहेत. जून महिन्यात सोयाबीन, उडीद, तूर व कांद्यांची लागवड व पेरण्या वेळेत झाल्या. मात्र सप्टेंबर व ऑक्टोबर मधील सातत्यपूर्ण पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उभ्या पिकात गुडघाभर पाणी साचल्यामुळे काढणी तर सोडाच पण झालेला खर्च तरी निघतोय का नाही याची चिंता शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र सोयाबिन पिकाखाली असून अद्याप पन्नास टक्के ही काढणी झालेली नाही. पावसाची उघडीप नसल्याने सोयाबीनच्या शेंगा झाडाला शेतातच उगवल्या व उडीदाने बुरशी धरली आहे. सततच्या ओलाव्यामुळे तुरीच्या मुळ्या थांबल्या-मोड जागेवरच पिवळे पडू लागले. तर कांद्याची रोपे पिवळी पडून जळून गेली आहेत. कापणीविना सोयाबीन पाण्यात सडू लागले आहे. त्यामुळे सर्व गावांतून पंचनामे व्हावेत, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

हेही वाचा: वैराग ते धामणगाव रोडवरील नागझरी नदीवर नवीन पुलासाठी निधी मंजूर : आमदार राऊत

६५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झालेल्या गावांमध्येही पंचनामे करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली असून त्यांच्या आदेशा नंतरच पुढील उपाय योजना करण्यात येईल असे नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी सांगितले.

तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई मिळण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात भेटणार आहे.

- राजेंद्र राऊत, आमदार

चार मंडळातील वगळलेल्या गावांमध्ये सतत ६५ मिलिमीटर च्या आत पाऊस पडलेला आहे. खास बाब म्हणून विचार होणे गरजेचे आहे. याकरिता मंत्रालयात माझा पाठपुरावा राहील.

- दिलीप सोपल, माजी मंत्री

वगळलेल्या 46 गावांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर माझे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही नुकसानग्रस्त शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, ही माझी भूमिका राहील.

- निरंजन भूमकर, निमंत्रित सदस्य,जिल्हा नियोजन समिती

loading image
go to top