esakal | 'वंचित'चे आंदोलन : पंढरपुरात 400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सात प्रमुख रस्त्यावर तिहेरी नाकाबंदी 
sakal

बोलून बातमी शोधा

In Pandharpur 400 police personnel cordoned off seven major roads

दरम्यान, पंढरपुरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील जमाव बंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

'वंचित'चे आंदोलन : पंढरपुरात 400 पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सात प्रमुख रस्त्यावर तिहेरी नाकाबंदी 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर (सोलापूर) : विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, या मागणीसाठी उद्या (सोमवार) बहुजन वंचित आघाडी आणि विश्व वारकरी सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासाठी ऍड. प्रकाश आंबेडकर पंढरपूर परिसरात दाखल झाल्याची माहिती आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लावला आहे. बंदोबस्तासाठी 50 पोलिस अधिकारी आणि 400 पोलिस कर्माचारी दाखल झाले आहेत. आंदोलक शहरात येऊत नये यासाठी शहराला जोडणाऱ्या प्रमुख सात रस्त्यावर तिहेरी नाकाबंदी करण्यात आली आहे. शिवाय मंदिर परिसरातील छोट्यामोठ्या 30 रस्त्यांवर बॅरिकेटिंग करून सील केले आहेत, अशी माहिती सोलापूर ग्रामीणचे अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी आज दिली. 
विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर प्रवेश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी आज सायंकाळी मंदिर परिसर, चंद्रभागा नदी तिरावरील घाट, प्रमुख चौक आदी ठिकाणी जावून पहाणी केली. या दरम्यान त्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. त्यानंतर श्री. झेंडे यांनी पत्रकारांशी बोलताना बंदोबस्ता या विषयी माहिती दिली. आंदोलनादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत. आंदोलनाविषयी त्यांच्याशी आम्ही चर्चा देखील करणार आहे. कोणत्याही परिस्थितीत लोकांनी गर्दी करू नये यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यासाठी चेकपोस्ट तयार केले आहेत. कायदा सुव्यवस्था बिघडेल, असे कोणीही कृत्य करू नये, असे आवाहनही अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे. 

संपादन : वैभव गाढवे 

महाराष्ट्र

loading image