
पंढरपूर : विठुरायाचा शिणवटा दूर
पंढरपूर : आषाढी आणि कार्तिकी यात्रेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. त्यानुसार आज (ता.१८) मोठ्या उत्साहात प्रक्षाळपूजा साजरी करण्यात आली. यात्रा काळात जास्तीत जास्त वारकऱ्यांना दर्शन व्हावे यासाठी मंदिर २४ तास उघडे असते. भक्तांसाठी अहोरात्र उभा राहून दमलेल्या विठूरायाचा शिणवटा दूर व्हावा यासाठी देवाला तेल लावण्यात आले.
आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेला काढा दाखवण्यात आला. रेंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मंदिरात सजावट करण्यात आली. यात्रा काळात बंद करण्यात आलेले राजोपचार आजपासून पुन्हा सुरू करण्यात आले.
यथा देहे तथा देवे, या उक्ती प्रमाणे विठुरायाला उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी चंदन उटी पूजा केली जाते. थंडीत गार वाऱ्याचा त्रास होऊ नये यासाठी रात्री मंदिर बंद करताना शेजारती वेळी देवाच्या कानावरुन कानपट्टी बांधली जाते. त्याच प्रमाणे आषाढी आणि कार्तिकी यात्रांच्या नंतर प्रक्षाळपूजा करण्याची परंपरा आहे. प्रक्षाळपूजेच्या आदल्या रात्री देवाच्या शेजघरातील पलंग काढून ठेवलेला असतो. तो पलंग पूर्ववत ठेवला जातो. परंपरेप्रमाणे चवरे महाराजांचे जागराचे भजन होते. संपूर्ण मंदिर धुवून स्वच्छ केले जाते. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी मंदिरात सजावट केली जाते.
यात्रा काळात भक्तांना दर्शन देण्यासाठी अहोरात्र उभा राहून थकलेल्या विठुरायाचा थकवा दूर करण्यासाठी देवाच्या अंगाला तेल लावले जाते. देवाच्या चरणांना लिंबू साखर लावून चोळले जाते आणि गरम पाण्याने स्नान घातले जाते.
गवती चहा, तुळस, ज्येष्ठमध, लवंग, वेलदोडे, गूळ, जायफळ, काळी मिरी अशा विविध आयुर्वेदिक वनस्पतींपासून बनवलेला काढा तयार करुन तो देवाला नैवेद्य म्हणून दाखवला जातो. देवाला आकर्षक पोषाख करुन पारंपारिक अलंकार घातले जातात. यात्रेच्या आधीपासून बंद करण्यात आलेले काकडा, धुपारती, शेजारती आदी राजोपचार आजपासून पुन्हा सुरु केले जातात. या प्रथेप्रमाणे आज प्रक्षाळपूजा झाली. सदस्या अॅड. माधवी निगडे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते श्री रुक्मिणीमातेची पूजा करण्यात आली. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे उपस्थित होते.
Web Title: Pandharpur Vitthal Rukmini Temple During Prakshaal Shinwat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..