शिक्षणासाठी आई-वडिलांनी जमीन विकली आज त्यांचा मुलगा प्रशासनात उच्च अधिकारी

वयाच्या 32 व्या वर्षी पाचव्या प्रयत्नात अधिकारी झालेले पांडुरंग चोरमले
Pandurang Chormale UPSC Officer Success story Umrad solapur
Pandurang Chormale UPSC Officer Success story Umrad solapur

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - न हरता, न थकता, न थाबंता प्रयत्न करणाऱ्यांसोमर कधी कधी नशीब सुध्दा हारत. त्यासाठी फक्त यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. तर तुम्हाला यशापासुन कोणीही रोखू शकत नाही. याचा प्रत्यय उमरड (ता. करमाळा) येथील शेतकरी कुटुंबातील पांडुरंग गोरख चोरमले यांच्या यशातून दिसून येतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरी करत असताना. नोकरीचा राजीनामा देऊन स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला. परंतु सलग चार वर्षे अपयश येऊनही हार न मानता जिद्दीने पाचव्या प्रयत्नात यूपीएससीतुन भारतीय डाकसेवा अधिकारी (IPOS) या पदाला गवसणी घातली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

या यशाबद्दल पांडुरंग चोरमले सांगतात की, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, अल्पभूधारक शेतकरी कुटुंब‌. मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असायचा. आई-वडिल दोघेही अशिक्षित जरी असले तरी शिक्षणाच्या बाबतीत जागरूक होते. गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आमची वस्ती होती. तिथेच उघड्यावर एका झाडाखाली पहिली ते चौथीपर्यंत शाळा भरायची. नंतर माध्यमिक शिक्षण गावातील वामनराव बदे विद्यालयातुन पुर्ण केले. लहानपणापासून हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जात असल्याने, आत्मविश्वास आणखी वाढायाचा. अभ्यासाबरोबरच घरची जनावरे राखणे, इतर कामात आई-वडिलांना मदत करून गुणवत्तेचा आलेख प्रगतीपथावर असायचा. त्यामुळे आई वडिलांना आनंद तर होत असायचा. दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील अकरावी बारावीसाठी बारामती येथील महाविद्यालयात प्रवेश घेऊन देण्यात आला. शिक्षणासाठी अधिक खर्च वाढल्याने, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली.

बारावीनंतर पुणे येथून धातुशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. याकाळात पैशाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासत होती. त्यामुळे वडिलांनी व्याजाने कर्ज काढले. तर आईने स्वतःचे सोने गहाण ठेवून पदवीच्या शिक्षणासाठी पैसे पुरवले. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत कसलीही कमतरता भासू दिली नाही. याकाळातच शिक्षणासाठी काही जमीन देखील विकली. परंतु मी चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे. एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. त्यांच्या कष्टामुळेच मी शिक्षण पूर्ण करू शकलो. त्यांनी अनेक हालअपेष्ठा सोसत शिक्षणासाठी पैसे उभा केले. घरच्या या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, जिद्द व चिकाटीने अभ्यास करत चांगल्या गुणांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर लगेच नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची व पदाची नोकरी मिळाली. आईवडिलांचे कष्ट सार्थकी लागले होते. पगारातुन आलेल्या पैशातून घरची परिस्थिती देखील थोडीफार सुधारली होती. याकाळात लग्नही झाले. परंतु नोकरीच्या काळात स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती मिळाली व आपण अधिकारी होऊ शकतो असा एक आत्मविश्वास निर्माण झाला. त्यामुळे कंपनीकडून विदेशात नोकरीची सुवर्णसंधी असताना देखील न जाता. नोकरी करत स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला.

नोकरी करत स्पर्धा परीक्षा व्हायची नाही. यासाठी नोकरीचा राजीनामा दिला व पुर्णवेळ स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. याबाबत आई-वडिल, बायको, बहिणीला कल्पना दिली. सर्वांनी माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यांचे प्रोत्साहन आणखी बळ देणारे होते. युपीएससीची तयारी सुरू केली‌. कुठेही क्लासेस न लावता स्वय: अध्ययन सुरू केले. त्यासाठी दिल्ली गाठली. मित्रांच्या मार्गदर्शन व पाठिंबामुळे अभ्यास सुरू होता. हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन, इथपर्यंत कसे आलो याचे भान ठेवत. आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलो. परंतु पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात अपयश सामोरे जावे लागले. त्यात हातात नोकरी नसल्याने, परत आर्थिक चणचण भासू लागली. याकाळात पत्नीने आर्थिक परिस्थितीचा माझ्या अभ्यासावर परिणाम होऊ नये याकरीता एक ठिकाणी नोकरी करत कुटुंबांचा उदरनिर्वाह चालु ठेवला तर परिक्षेच्या काळात लागणाऱ्या खर्चासाठी बहिणीने मदत केली. त्याचबरोबर काही मित्रांनीही मदत केली. जवळपास सलग तीन-चार वर्षे गेली तरी देखील यशाचा स्थान थांगपत्ता लागत नव्हता. अधून मधून गावाकडे आलो अनेकांचे बोलणे टोमणे खावे लागयाचे. आई-वडिलांना आणखी किती दिवस अडचणीत टाकणार. खात्या भाकरीला लाथ मारली, आता भोगा फळे, नोकरी सोडायची काहीच गरज नव्हते. असे अनेकजण समाजातुन बोलायचे. त्यामुळे आत्मविश्वास खच्चीकरण व्हायचं.

एकीकडे स्पर्धा परीक्षेत यश नव्हते, हातात नोकरी नव्हती, वय वाढत चालले होते, समाजात बोलणे खावे लागायचे. अशा अशा स्थितीत कुटुंबीय व मित्रपरिवारने पूर्णपणे पाठिंबा दिला. जवळपास यूपीएससीच्या सलग चार अपयशानंतर पाठीमागील चुका सुधारत एक नव्या उमेदीने व जोशाने परिक्षेला सामोरे गेलो अन् वयाच्या 32 व्या वर्षी, पाचव्या प्रयत्नात यूपीएससीतुन भारतीय डाकसेवा अधिकारी (IPOS) म्हणून निवड झाली. सध्या कोलकत्ता येथे कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com