अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला द्याल तर वडिलांवरच होईल कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children

सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका अल्पवयीन मुलाच्या वडिलास दोन हजारांचा दंड ठोठावला आहे.

अल्पवयीन मुलाला गाडी चालवायला द्याल तर वडिलांवरच होईल कारवाई

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोणत्याही व्यक्‍तीला 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय वाहन चालविण्याचा परवाना दिला जात नाही. तरीही, नियमांचे उल्लंघन करून 18 वर्षाच्या आतील मुलगा अथवा मुलीने वाहन चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्या पालकांना दोषी धरले जाणार आहे. त्यानुसार सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका अल्पवयीन मुलाच्या वडिलास दोन हजारांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान

राज्यभरात दरवर्षी रस्ते अपघातात जवळपास 20 हजार व्यक्‍तींचा मृत्यू होतो. राज्यातील टॉपटेन अपघाती शहर-जिल्ह्यात सोलापूरचाही समावेश आहे. मुलगा चांगल्या गुणाने दहावी अथवा बारावी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात पालकांकडून त्याला मोबाईल किंवा दुचाकी भेट दिली जाते. काही तरुण मुलांना नुकतीच 18 वर्षे पूर्ण झालेली असतात, त्यांना वाहतूक नियमांची पुरेशी माहितीदेखील नसते, तरीही पालक त्याच्या ताब्यात वाहन देतात. त्यामुळे मोबाईल टॉकिंग, रस्त्याच्या विरुध्द दिशेने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे, अतिवेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी तथा माल वाहतूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र, आता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, रस्ते अपघातावर नियंत्रण आणून अपघाती मृत्यू कमी करण्यावर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट बंधनकारक नाही, तरीही विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जात आहे.

हेही वाचा: सोलापूर जिल्हा परीषदेचे दोन कर्मचारी निलंबित

पालकांनी मुलांचा जीव धोक्‍यात घालू नये

अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे गुन्हा आहे. मोटार वाहन अधिनियम कलम पाचअंतर्गत त्या मुलाच्या पालकाविरुध्द न्यायालयात खटला दाखल केला जातो. रस्ते अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. पालकांनी अल्पवयीन मुलाच्या ताब्यात वाहन देऊन त्याचा जीव धोक्‍यात घालू नये.

- चंद्रकांत वाबळे, पोलिस निरीक्षक, वाहतूक

हेही वाचा: सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात! पती-पत्नी जागीच ठार

11 दिवसांत बेशिस्तांना 19 लाखांचा दंड

शहरातील बेशिस्त वाहतूक कमी व्हावी, रस्ते अपघात कमी व्हावेत, वाहनचालकांना शिस्तीचे धडे मिळावेत, या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी 11 नोव्हेंबरपासून कारवाई कडक केली आहे. मागील 14 दिवसांत नऊ हजार 41 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जवळपास 19 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्यात एका अल्पवयीन मुलाने वाहन चालविल्याप्रकरणी वडिलावर कारवाई केल्याचाही समावेश आहे.

loading image
go to top