बालरोगतज्ज्ञ म्हणतात, तिसऱ्या लाटेत लहान मुले बनू शकतात सुपर स्प्रेडर ! अशी घ्या खबरदारी

बालरोगतज्ज्ञ म्हणतात की तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोक्‍याची शक्‍यता आहे
Super Spreader
Super SpreaderCanva

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) संसर्गात लहान मुले (Kids) आतापर्यंत बऱ्यापैकी सुरक्षित राहिली असली तरी नोव्हेंबरच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा धोका वाढेल, अशी शक्‍यता आहे. तर या मुलांसाठी असलेल्या लसीच्या चाचण्या देखील वेगाने सुरू आहेत. सध्या तरी पालकांना त्यांच्या पाल्यांची काळजी घेऊन ते कुटुंबात कोरोनाचे सुपर स्प्रेडर (Corona Super Spreader) होऊ नयेत याची काळजी घेण्याची गरज आहे. "कॉफी विथ सकाळ'मध्ये "लहान मुलांमधील कोरोना संसर्ग व तिसरी लाट' याबाबत ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञांनी (Pediatricians) त्यांची मते मांडली. (Pediatricians say that children are at risk in the third Corona wave)

बदलती लक्षणे व लस

सध्या बालकांना कोरोनाची लस (Covid Vaccine) देण्याच्या संदर्भात अमेरिका व इतर काही देशांत चाचण्या सुरू आहेत. सध्या लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग पूर्वीपेक्षा थोडा वाढलेला आहे. एकूण टेस्टिंगच्या प्रमाणात केवळ दहा टक्के मुले पॉझिटिव्ह आढळत आहेत. त्यांच्यामध्ये ताप, सर्दी व खोकला, वास व चव जाणे, थकवा ही लक्षणे आहेत. काही गुंतागुंतीच्या केसेस आढळत आहेत. वयोगट 5 ते 10 मुलांमध्ये जुलाब, पोटात दुखणे ही लक्षणे देखील दिसून येतात.

Super Spreader
रविवारी एकाच दिवशी 2625 जण कोरोनामुक्त ! जिल्ह्यातील 52 जणांचा मृत्यू

मुले बनू शकतात कोरोनाचे सुपर स्प्रेडर

लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असला तरी ते कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात. त्यांच्यात लक्षणे फार कमी दिसतात व लवकरच ही लक्षणे गायब होतात. मात्र ते घरातील लोकांसाठी सुपर स्प्रेडर ठरू शकतात. ही मुले खेळण्यासाठी सातत्याने इतर मुलांमध्ये मिसळतात. तसेच घरातील अधिक वयाच्या विशेषतः आजी- आजोबांसाठी कोरोना संसर्ग पोचवू शकतात.

तिसऱ्या लाटेपूर्वी लहान मुलांसाठी लस आल्यास धोका कमी

तिसऱ्या लाटेची शक्‍यता पाहता लहान मुलांच्या संदर्भात सातत्याने जगभरात कोरोना संसर्गाचा अभ्यास सुरू आहे. तसेच लहान वयोगटासाठी लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वसाधारण या प्रकारच्या विषाणूजन्य आजाराच्या लाटा येत असतात. मात्र प्रत्येक लाटेत अधिक प्रभावीत असणारा वयोगट वेगळा असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सध्याच्या लहान वयोगटासाठी लसीच्या चाचण्या केल्या जात आहेत. या चाचण्या तिसरी लाट येण्यापूर्वी यशस्वी झाल्या तर बहुतांश धोके कमी होतील. पण सध्या तरी मुलांना एकत्र खेळणे टाळले पाहिजे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करावे लागणार आहे. सध्याच्या स्थितीत लहान मुले बऱ्यापैकी कोरोना संसर्गापासून वाचलेली आहेत. लस आल्यास लहान मुलांच्या पूर्वीच्या लसीकरणामध्ये कोरोनाची लस वाढेल.

- डॉ. अतुल कुलकर्णी, माजी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, इंडियन पेडिऍट्रिक असोसिएशन, सोलापूर

Super Spreader
प्रशासनाच्या पाठबळानेच पंढरपुरात पेड कोविड सेंटरचा अजब प्रयोग ! पालकमंत्र्यांनीच केले उद्‌घाटन

मुलांना सी व डी जीवनसत्त्वाची गरज

तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मुलांना होऊ शकतो, ही शक्‍यता गृहीत धरली जात आहे. कोरोनाच्या रुग्णांना सकस आहार हे अत्यंत महत्त्वाचे असते. याच तत्त्वाचा उपयोग मुलांसाठी मुलांच्या पालकांनी केला पाहिजे. मुलांना बेकरीतील पदार्थ, पिझ्झा, बर्गर किंवा बाहेरचे कोणतेही फूड देऊ नये. मागील वर्षी होम पार्सल सेवा बंद होती; पण आता सुरू आहे. त्यामुळे बाहेरून अन्न मागवण्याचे प्रकार होतात, ते टाळले पाहिजेत. मुलांना रोज घरी बनवलेले वरण, भात, भाजी व पोळीसोबत पालेभाज्या व फळे नियमित दिली पाहिजेत. शेवटी सकस आहारच हा एक या साथीत चांगला आधार आहे, हे समजून घेत मुलांना तो दिला पाहिजे. दोन महत्त्वाचे स्रोत म्हणजे जीवनसत्त्व सी व जीवनसत्त्व डी मुलांना मिळायला हवे. जीवनसत्त्व सी हे लिंबू, संत्री व मोसंबी फळातून देखील मिळते, तर जीवनसत्त्व डी केवळ मुलांना सकाळच्या कोवळ्या उन्हात काही वेळ थांबवले तरी मिळते. मुलांना स्वच्छ आंघोळ व जेवण देत असताना ते टीव्ही व मोबाईल कमी पाहतील याकडे लक्ष द्यावे.

- डॉ. सरिता आरकाल, सचिव, सोलापूर बालरोगतज्ज्ञ संघटना

तिसऱ्या लाटेत मुलांची काळजी घेण्यासाठी बालरोगतज्ज्ञ तयारीत

तिसऱ्या लाटेत मुले सापडू शकतील हा आमच्यासमोर खरा प्रश्‍न आहे. लॉकडाउनमुळे जी मुले आईवडिलांच्या व्यस्ततेमुळे कुपोषित झाली होती ती आता सुधारली आहेत. तर काही मुले शाळा किंवा मैदानी खेळ कमी झाल्याने लठ्ठपणाकडे वळली आहेत. लठ्ठपणा हा एक कुपोषणाचा प्रकार आहे, जो की जादा खाण्यातून येतो. मुलांना बाहेर खेळायला मिळत नसेल तर निदान सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या असे खेळ खेळवून घ्यावेत, जेणेकरून त्यांचे पचन कायम सुधारत राहील. टिव्ही व मोबाईलच्या वाढत्या वापराने मुलांचा स्क्रीन टाइम कायम वाढतो आहे. त्यावर मुले सतत हिंसेची दृश्‍ये पाहतात. त्यामुळे त्यांची मानवी जीवनाबद्दल संवेदनशीलता संपते. हे सर्वात धोकादायक आहे. तसेच अपार्टमेंट कल्चरमध्ये बंदिस्त राहण्याची सवय मोडली पाहिजे. लहान मुलांचे लसीकरण लवकर सुरू व्हावे यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम सुरू आहे. बालरोगतज्ज्ञ संघटना ही तिसऱ्या लाटेत लहान मुलांची काळजी घेण्यासाठी तयारीत आहे.

- डॉ. वैशाली शिरशेट्टी, अध्यक्षा, सोलापूर बालरोगतज्ज्ञ संघटना

मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचे

कोरोना संसर्गात अजूनही लहान मुले सुरक्षित राहिली आहेत; पण हीच स्थिती पुढच्या लाटेत राहील किंवा नाही याची खात्री नाही. पुढील काळात मुलांना होणारा संसर्ग व मृत्यूदराचे प्रमाण याची चिंता आहे. निदान त्याचा विचार करून लहान मुलांच्या उपचाराची सुविधा असायला हवी. किशोरवयीनसाठी लसीकरण किती लवकर उपलब्ध होणार आहे त्याची प्रतीक्षा आहे. शेवटी प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक योग्य. त्यानुसार लसीकरण हवेच आहे. अधूनमधून काही गुंतागुंतीच्या केसेस राज्यभरातून रिपोर्ट होत आहेत. पण त्याचे प्रमाण अद्याप तरी कमी आहे. मुलांसाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा उपयोग सातत्याने केला पाहिजे. मुलांच्या सकारात्मक विकासाच्या दृष्टीने पालकांनी अगदी कोरोना काळात जागरूकतेने मुलांच्या हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे. मुलांचा आहारविहार व झोप यांसारख्या सर्व गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

- डॉ. मंजूषा चाफळकर, वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका सोलापूर

पाच उपायांमुळे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकू शकतो

लहान मुलांच्या बाबतीत पुढील लाटेची शक्‍यता व्यक्त होत आहे. पण त्यापूर्वी आपल्या हातात आताच मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझर हे नियम आहेत. त्यामध्ये आता आयसोलेट व आयडेंटिफाय म्हणजे नवीन रुग्ण शोधून ते वेगळे केले पाहिजेत. पाचवा पर्याय म्हणजे लस काही वयोगटापर्यंत आली आहे. ती लहान मुलांच्या वयोगटापर्यंत येणारच आहे. या सर्व उपायांचा एकत्रित उपयोग करण्याचे काम व्हायला हवे. अजूनही लहान मुलांमध्ये कोरोना आजारातून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. ही बाब सकारात्मक मानली पाहिजे. पण यदाकदाचित पुढील लाटेत काय होईल हे सांगता येत नाही. पण सध्या असलेले पाच उपाय व लसीकरण हे कोरोनाविरुद्ध लढाई जिंकून देणारी साधने आहेत, हे लक्षात घेऊन काम करायला हवे. लहान मुले पॉझिटिव्ह झाली तर त्यांना विलगीकरण केले पाहिजे. आई पॉझिटिव्ह असेल तर आईसोबत बाळाला विलगीकरण करण्याची गरज आहे. निदान आपल्याला सॅनिटायझर वापरता नाही आले तर घरच्या घरी साबणाने हात धुण्याची सवय लावून घ्यावी.

- डॉ. हेमंत साठे, बालरोगतज्ज्ञ सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com