
पोलिस आयुक्त राजेंद्र मानेंचा प्लॅन! सोलापुरातील वाहतूक कोंडी कायमची सुटणार
सोलापूर : शहरातील अरुंद रस्ते आणि रस्त्यांलगतच्या अतिक्रमणांमुळे सातत्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर आता छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीवेस पोलिस चौकी, सत्तर फूट रोड, अशोक चौक अशा मोजक्या ठिकाणी वाहतूक पोलिस अधिकारी व अंमलदार उभारतील. इतरवेळी बेशिस्त वाहनांवर कारवाई करतील, अशा सूचना पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी केल्या आहेत.
सोलापूर शहरात प्रवेश केल्यानंतर दोन-तीन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तब्बल २० ते ३० मिनिटे लागतात. रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांसह शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसचालकांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा अवजड वाहने वेळ न पाळताच शहरातून ये-जा करतात आणि त्यामुळेही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पण, आता शुक्रवारपासून (ता. २९) वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नवीन नियोजनाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई केली जाणार असून विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, दुचाकीवरून ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग, मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे.
वाहतूक पोलिसांसोबत ‘अतिक्रमण हटाव’ची टीम
शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कायमची सोडवावी, बेशिस्त वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी या हेतूने शहर वाहतूक पोलिसांनी नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांसोबत आता महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकदेखील असणार आहे. त्यासंदर्भात उद्या (बुधवारी) महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासोबत बैठक होणार आहे. शहरातील वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा मिटविण्यासाठी पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी पुढाकार घेतला आहे.
वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी आता सूक्ष्म नियोजन
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करणे, बेशिस्तांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने ठोस नियोजन केले आहे. रस्त्यांलगत असलेले अतिक्रमण हटविण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा झाली आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी आता सूक्ष्म नियोजन असेल.
- राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर
शहर ‘वाहतूक’चे मनुष्यबळ
शहर वाहतूक शाखेचे दक्षिण व उत्तर असे दोन विभाग आहेत. त्याअंतर्गत एक सहाय्यक पोलिस आयुक्त, दोन पोलिस निरीक्षक आणि इतर आठ अधिकारी, १५० वाहतूक पोलिस अंमलदार आहेत. पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक कोंडी सोडविण्याचे नियोजन केले जात आहे. आता हे कर्मचारी सकाळी नऊ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी असतील. त्यानंतर दुपारी १२ ते सायंकाळी साडेचार-पाच वाजेपर्यंत बेशिस्तांवर कारवाई करतील. पुन्हा साडेपाचपासून वाहतूक कोंडीच्या ठिकाणी दिसतील, असे हे नियोजन असणार आहे.
Web Title: Police Commissioner Rajendra Manes Planning Traffic Jam In Solapur Will Be Solved
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..