पोलिस आयुक्तांचा प्रयोग! जड वाहतूक आता २४ तास खुली होणार; शहराअंतर्गत तिढा लवकरच सुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cp rajendra mane
पोलिस आयुक्तांचा प्रयोग! जड वाहतूक आता २४ तास खुली होणार; शहराअंतर्गत तिढा लवकरच सुटणार

पोलिस आयुक्तांचा प्रयोग! जड वाहतूक आता २४ तास खुली होणार; शहराअंतर्गत तिढा लवकरच सुटणार

अक्कलकोट व विजयपूरला जाणारी वाहने सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत एकाच ठिकाणी थांबून राहतात. शहरातून जड वाहनांना त्यावेळेत निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पण, रात्री नऊनंतर वाहने सोडताना प्रचंड गर्दी होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यात पुन्हा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड ते शांती चौक हा दीड किलोमीटरचा मार्ग जड वाहनांसाठी २४ तास खुला करून दिला जाणार आहे.

त्या रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात केले जाणार आहेत. जेणेकरून वाहनांचा वेग मर्यादित राहावा आणि अपघात होऊ नयेत हा त्यामागील हेतू आहे. ती वाहने शांती चौकातून अक्कलकोट रोडवरून पुढे जातील. त्यांच्यासाठी पुढे होटगी ते कुंभारी हा मार्ग उपलब्ध असणार आहे. त्यामुळे शांती चौक ते गुरुनानक चौक, महावीर चौक, पत्रकार भवन येथून विजयपूरला जाणारी जड वाहने त्या मार्गावरून दिवसा येणारच नाहीत. दरम्यान, वाहने सतत ये-जा करीत राहिल्याने रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडी व अपघात टळतील असा विश्वास पोलिस आयुक्तांनी व्यक्त केला आहे.

पोलिस आयुक्तांचे संभाव्य नियोजन

दक्षिण सोलापुरातून सिमेंट घेऊन जाणारे बल्कर शहरातून न येता होटगी ते कुंभारी या रस्त्यावरून अक्कलकोट रोडमार्गे शांती चौक, मार्केट यार्ड मार्गावरून पुणे महामार्गाला लागतील. त्याशिवाय त्या वाहनांसाठी हत्तूर-केगाव (विजयपूर) बायपास देखील खुला असणार आहे. त्यामुळे ती वाहने थांबून राहणार नाहीत, असे नियोजन करण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणी दोन-चार दिवसांत होईल.

व्यावसायिकांची सुटणार कोंडी

शहरात येणारी जड वाहने सध्या १४ तास शहराबाहेरच थांबवली जात आहेत. नवीन आदेशामुळे त्या वाहनांना दुपारी एक ते चार या वेळेत येण्यास निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांची कोंडी झाली असून त्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच ठोस मार्ग काढला जाणार आहे.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर