esakal | मृत आजीचं अख्खं कुटुंब क्वारंटाइन ! खाकी वर्दी आली धावून अन्‌ केला अंत्यविधी

बोलून बातमी शोधा

Karkamb
मृत आजीचं अख्खं कुटुंब क्वारंटाइन ! खाकी वर्दी आली धावून अन्‌ केला अंत्यविधी
sakal_logo
By
सूर्यकांत बनकर

करकंब (सोलापूर) : त्यांच्या घरातील सर्वांना कोरोनाची लागण... सर्वजण पंढरपूर येथे विलगीकरण कक्षात... नाही म्हणायला घरात एकटी 60 वर्षांची आजी... पण तिचाही घरातच कोरोनाने मृत्यू... गावातील कोणीही जवळ जायलाही धजावेना... पोलिस पाटलाची करकंब पोलिस ठाण्यात वर्दी... मग काय, कोरोना काळात देव बनून रस्त्यावर उतरलेली खाकी वर्दी येथे मरणानंतरही मदतीला धावून आली आणि स्वतःचा जीव धोक्‍यात घालून पोलिसांनीच उरकला त्या मृत आजीचा अंत्यविधी !

ही घटना काल (रविवारी) सांगवी (ता. पंढरपूर) येथे घडली. मृत आजीचे संपूर्ण कुटुंब कोरोना बाधित असल्याने सर्वजण पंढरपूर येथे विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल आहेत. त्यामुळे आजीच्या अंत्यविधीसाठी त्यांना जाता येईना. गावात आजीच्या अंत्यविधीकरिता कोणीही पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत करकंब पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश मुंडे, सिरमा गोडसे, अमोल घुगे आदींनी पुढाकार घेऊन घटनास्थळी धाव घेतली. कोरोनाच्या धास्तीने अंत्यविधीसाठी कोणीही पुढे येत नसल्याने त्यांनी मृताचे जवळचे नातेवाईक सून व जावई यांना बोलावून घेऊन त्यांच्या उपस्थितीत सर्व सोपस्कार पार पाडत स्वतःच अंत्यविधी उरकला.

हेही वाचा: पालकमंत्र्यांची पोलिस बंदोबस्तात बैठक ! बंदोबस्ताचे "हे' होते कारण

कोरोनामुळे सध्याची परिस्थिती अतिशय भयानक बनली आहे. एकीकडे लस, इंजेक्‍शन, ऑक्‍सिजनचा तुटवडा असताना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढताना शेवटच्या क्षणी आप्तस्वकीयही जवळ नसणे हे खूपच वेदनादायी आहे. अशा परिस्थितीत पोलिस सर्वच पातळ्यांवर जीवाची बाजी लावून काम करत आहेत. नागरिकांनीही आता तरी स्वतःची जबाबदारी ओळखून सर्वतोपरी खबरदारी घ्यावी.

- प्रशांत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक