esakal | मोडनिंबमध्ये साडेनऊ लाखांचे रेशनचे धान्य जप्त! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मोडनिंबमध्ये साडेनऊ लाखांचे रेशनचे धान्य जप्त! तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमध्ये भरलेला व गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला रेशनचा अंदाजे 7 लाख 65 हजार रुपये किमतीचा गहू तसेच गोडावूनमधील 1 लाख 79 हजार रुपये किमतीचा तांदूळ टेंभुर्णी पोलिसांनी पकडला.

मोडनिंबमध्ये साडेनऊ लाखांचे रेशनचे धान्य जप्त! गुन्हा दाखल

sakal_logo
By
संतोष पाटील

टेंभुर्णी (सोलापूर) : मोडनिंब मार्केट यार्डमधील (Modnimb Market Yard) गोरख पांडुरंग सुर्वे आडत दुकानाचे मालक सतीश माणिक सुर्वे यांनी ट्रक चालक व वाहकाच्या मदतीने बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमध्ये भरलेला व गोडावूनमध्ये साठवून ठेवलेला रेशनचा अंदाजे 7 लाख 65 हजार रुपये किमतीचा गहू तसेच गोडावूनमधील 1 लाख 79 हजार रुपये किमतीचा तांदूळ, (Ration) असा एकूण 9 लाख 44 हजार रुपये किमतीचे धान्य टेंभुर्णी पोलिसांनी (Tembhurni Police) पकडले. याप्रकरणी आडत मालक, ट्रकचालक व वाहकाच्या विरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

हेही वाचा: धोत्रे येथील पोलिस पाटलाला तरुणाने भोसकले! प्रकृती गंभीर

मोडनिंब मार्केट यार्डमधील गोरख पांडुरंग सुर्वे आडत दुकानाचे मालक सतीश माणिक सुर्वे (रा. बैरागवाडी, ता. माढा), ट्रकचालक मालक रामेश्वर भगवान देठे (वय 23 रा. चिखलबिड, ता. वडवणी जि. बीड), वाहक तुषार गोवर्धन फड (वय 21, रा. घाटसावळी ता. जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना बुधवारी सायंकाळी मोडनिंब येथील मार्केट यार्डमधील आडत दुकानातून रेशनिंगचा गहू व तांदूळ एका ट्रकमध्ये भरत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद आदींच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले. मोडनिंब मार्केट यार्डमधील गोरख सुर्वे आडत दुकानासमोर उभ्या असलेल्या मालट्रक (एमएच 45/एएफ 0054) मध्ये हमाल आडत दुकानातील गव्हाच्या गोण्या आणून भरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पथकाने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना याविषयी माहिती दिली. आडत दुकानातील गहू व तांदूळ रेशनचा असल्याचा संशय आल्याने माढ्याचे तहसीलदार राजेश चव्हाण, पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार यांना फोनवरून याची माहिती दिली.

हेही वाचा: 'डीसीसी'त भीती 'मी पुन्हा येईन'ची!

पुरवठा निरीक्षक ज्ञानेश कुंठलवार, तलाठी वैभव पाटील (तुळशी), महेश राऊत (मोडनिंब), राजेंद्र चव्हाण (सापटणे टें) तेथे आले. त्यावेळी ट्रक व गोडावूनमधील गहू व तांदूळाची तपासणी केली. त्यानंतर मार्केट यार्डमधील वजन काट्यावर ट्रकमधील गव्हाचे वजन केले असता 25080 किलो अंदाजे किंमत चार लाख 25 हजार रुपये असल्याचे आढळून आले. तसेच गोडावूनमध्ये 350 गोण्यांमध्ये अंदाजे 20 टन 3 लाख 40 हजार व तांदळाच्या गोण्यांची पाहणी केली असता 150 गोण्यांमध्ये 12 टन अंदाजे किंमत 1 लाख 79 हजार रुपये असल्याचे दुकानदार सतीश सुर्वे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक पोपट काशीद यांनी फिर्याद दाखल केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील भोसले हे तपास करीत आहेत.

loading image
go to top