सोलापूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाण्याचा मेकओव्हर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madha Police Sation

सोलापूर : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाण्याचा मेकओव्हर

उपळाई बुद्रूक, (जि. सोलापूर) - गुन्हेगारांवर कमी झालेला वचक, त्याचबरोबर पोलीस ठाण्याच्या परिसरात दिसून येणारी अस्वच्छता, यामुळे अस्ताव्यस्त झालेले माढा पोलिस ठाणे, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांच्या कृतीशील प्रयत्नांमुळे कार्यालयीन अंतर्गत शिस्त व गुन्हे नियंत्रणासोबतच बाह्य व अंतर्गत स्वच्छता आणि सुशोभीकरणामुळे पोलीस ठाण्याचा मेकओव्हर होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून माढा पोलिस ठाण्याला काहीशी मरगळ आल्याचे चित्र दिसून येत होते. यामध्ये गुन्हेगारांवर वचक देखील कमी झाल्याचे दिसून येत होते. अवैध व्यवसायांवरील मोठ्या कारवाई थंडावल्या होत्या. अनेक गावांमध्ये गावगुंडाची दहशत वाढायला लागली होती. यात भर म्हणजे पोलीस ठाण्याच्या परिसरात देखील चैतन्य राहिले नव्हते. अस्ताव्यस्त उभे केलेली वाहने, सर्वत्र दिसून येणारी अस्वच्छता, दर्शनी भागातच अस्ताव्यस्त पडलेली अपघाग्रस्त वाहने यामुळे हा परिसर अतिशय खराब दिसत होता. त्यात सातत्याने अधिकारी बदलत असल्याने, सर्वसामान्यांच्या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने सर्वसामान्यांमध्ये पोलिसांबाबतचे मत देखील बदलायला लागले होते. परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा यांनी पदभार स्वीकारला. अन् 4 ते 5 महिन्यातच पोलीस ठाण्याच्या कायापालट होण्यास सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

कडक व तेवढेच संवेदनशील असलेले सहायक पोलिस निरीक्षक बुवा यांनी पोलीस ठाण्याचा कायापालट करण्याचा जणु चंगच बांधला. पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे, मुहम्मद शेख व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांनी पोलीस ठाण्याच्या परिसराची सुशोभीकरणाकडे लक्ष देत. परिसर स्वच्छ करताण्याबरोबर गुन्हेगारी आणि समाजविघातक प्रवृत्तींचीही साफसफाई करून कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्याची दुहेरी जबाबदारी निभावली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून काहीशी मरगळ आलेल्या येथील पोलीस ठाण्याचा कायापालट झालेला दिसुन येत असुन, आकर्षक रंगरंगोटीसह कामात देखील सुसूत्रता आल्याचे दिसून येत आहे.

वर्षभरात पोलीस ठाण्यात अंतर्गत केलेली कामे

ठाणे अंमलदारांची अरूंद असलेली खोली नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन नव्याने रूंदीकरण, कॉम्प्युटर, सीसीटीव्ही, शुद्ध पिण्याचे पाण्याची सोय, जुने रेकॉर्डचे जतन, गुन्ह्यांची जलद उकल, गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाणात वाढ, वर्षभरात पोलीस इमारतीच्या बाह्य परिसरात केलेली कामे वर्षानुवर्षे पोलीस ठाण्याच्या आवारात अडगळीत पडलेली अपघातग्रस्त वाहने व जप्त केलेली वाहने शासकीय नियमानुसार लिलाव करत महसूल आर्थिक तिजोरीत जमा, परिसराची स्वच्छता व रंगरंगोटी, बसण्यासाठी आसने, पोलिस कर्मचाऱ्यांची वाहने लावण्यासाठी जागा, समोरच्या परिसरात भिंतीलगत बाग फुलवत परिसर प्रफुल्लीत करणाऱ्या रोपांची लागवड‌.

हे उपक्रम राबविले वर्षभरात

पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी पोलिस पाटीलांच्या बैठका, विविध समाज्याचा लोकांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रापासुन परावृत्त करण्यासाठी प्रयत्न, माढा शहरात बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा सुरळीत करून त्याचबरोबर उद्घोषणेसाठी ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक यंत्रे लावण्यात आलेली आहेत. विविध सण उत्सावांच्यावेळी गावोगावी बैठका घेत पोलिसांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये भिती न राहता स्नेहाचे वातावरण असावे यासाठी प्रयत्न करत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न व त्यात यश.

एकाच क्लिकवर संपूर्ण गाव सावध

वाढत्या चोरी व दरोडे याला आळा घालण्यासाठी पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या प्रत्येक गावात एका उंचीच्या ठिकाणी भोंगा लावण्यात आला असुन, गावातील आपत्कालीन परिस्थितीच्यावेळी सायरन देऊन सावध करण्यासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे अनेक गावांना या सायरनचा फायदा झाला आहे.

नागरिकांच्या असणाऱ्या तक्रारी सोडवणे यासाठी माझे पहिले प्राधान्य असुन, पोलिसांविषयी सर्वसामान्य लोकांमध्ये भिती न राहता स्नेहाचे वातावरण असावे यासाठी प्रयत्नशील आहे.

- श्याम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक माढा.

माढा पोलीस ठाण्याच्या स्वच्छता व नीटनेटकेपणामुळे आवारात एकदम प्रसन्न वातावरण निर्माण झाले असुन, माढा शहरातील हि एकमेव सुसज्ज व सर्वोदयीसुविधा उपलब्ध असलेले एकमेव शासकीय कार्यालय आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

- मनिषा सुरवसे, पोलीस पाटील, वेताळवाडी (ता. माढा).

Web Title: Police Station Makeover Through Officer Staff Effort

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top