सेवानिवृत्त जवानाचा बैलगाडीतून मिरवणूक | Malegaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त जवानाची बैलगाडीतून मिरवणूक
बावी येथे सेवानिवृत्त जवानाचा सत्कार; बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढून अनोखे स्वागत-

मळेगाव : सेवानिवृत्त जवानाची बैलगाडीतून मिरवणूक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मळेगाव : भारतीय लष्करात अठरा वर्षाच्या प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झालेले बावी (आ) (ता. बार्शी) येथील सुपुत्र मेजर अमोल गव्हाणे यांचे ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. हातात तिरंगा देऊन बैलगाडीतून जंगी मिरवणूक काढण्यात आली.
देशीसेवा करून आपल्या घरी परतणाऱ्या जवानास बावी ग्रामस्थांनी अनोखा सॅल्यूट ठोकला आहे. अठरा वर्षाची प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर ते आपल्या गावी परतले आहेत. बावी ग्रामस्थांनी जात, पात, धर्म, पंथ गट-तट विसरून जल्लोषात मिरवणूक काढली. दारासमोर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळी, फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छ, हारतुरे, देशभक्तीपर गीते, ठिकठीकाणी महिलांनी केलेले औक्षण यामुळे संपूर्ण वातावरणच देशभक्तीमय झाले होते.

हेही वाचा: एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; रस्त्यावर शिवशाही, शिवनेरीची धाव

मेजर जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अमोल गव्हाणे व पत्नी रेश्‍मा गव्हाणे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. तसेच मेजर मच्छिंद्र फोपले, मेजर समाधान निमकर, मेजर पांडुरंग आगलावे, मेजर जगदीश पाटील या जवानांचा मानाचा फेटा, शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अमोल राजेंद्र गव्हाणे यांची २००४ मध्ये कारगिल येथे हवालदारपदी नेमणूक झाली. त्यानंतर पंजाब, भतींडा, मेरठ, झांशी, नागालॅंड, दिसपूर आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. १ नोव्हेंबर २०२१ला ते सेवानिवृत्त झाले आहेत. मेजर गव्हाणे बोलताना म्हणाले, भारतमातेची सेवा करून घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी वाजत-गाजत केलेलं स्वागत अनोखे आहे. या स्वागताने मी भारावून गेलो आहे.

हेही वाचा: सोनिया वा ममतांच्या नेतृत्वाला हरकत नाही

आई वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही बावी ग्रामस्थांनी दिलेले प्रेम आशीर्वाद व केलेले स्वागत यासाठी आयुष्यभर ऋणी राहीन. मातृभूमीची सेवा करून परतलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा व देशप्रेम अंतिम श्‍वासापर्यंत सुरूच ठेवेल असे मत मेजर गव्हाणे यांनी व्यक्त केले. यशवंत आगलावे, गणेश आगलावे, राहुल धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामस्थांनी भारत माता की जय, वंदे मातरमचा गजर करीत परिसर दणाणून सोडला. यावेळी सरपंच अरविंद करडे, जिल्हा परिषद सदस्य समधान डोईफोडे, सुनील मोरे, काका पतीलश, अशोक आगलावे, पिणू गव्हाणे यांनी देखील मेजर गव्हाणे यांचे स्वागत केले. प्रास्ताविक राहुल आगलावे तर सूत्रसंचालन शंकर आगलावे यांनी केले.

loading image
go to top