एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; रस्त्यावर शिवशाही, शिवनेरीची धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम
एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम

एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम; रस्त्यावर शिवशाही, शिवनेरीची धाव

पुणे : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे. या मुख्य मागणीसाठी पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. हा संप मोडीत काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. एसटीचे विलीनीकरण शक्य नसून कर्मचाऱ्यांना पगार वाढीचा तसेच अन्य पर्याय दिले जाऊ शकतात. अशी चर्चा केली जात आहे. मात्र, संप मिटविण्यासाठी सरकारपुढे केवळ एसटी महामंडळाचे विलीनीकरण करणे हाच शेवटचा पर्याय आहे, असे स्वारगेट येथील संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

पुणे शहरातील स्वारगेट, वाकडेवाडी (शिवाजी नागरी), पुणे स्टेशन आदी आगारांसह जिल्ह्यातील १३ डेपोतील कर्मचारी सलग दहाव्या दिवशी संपात सहभागी झाले आहेत. स्वारगेट येथील एसटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी (ता. १७) बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. गेल्या दहा दिवसांपासून जागर गोंधळ, मुंडण आंदोलन, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे थाळीनाद आंदोलन आणि मोर्चा, विठुरायाच्या चरणी विलीनीकरणासाठी घातलेले साकडे.

अशा विविध पद्धतीने संपाकडे एसटी कर्मचारी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, केवळ संपामध्ये फूट पाडण्याचे काम सरकारकडून केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी स्वारगेट आगारातील एसटी बस गाड्या बाहेर काढण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाने केला होता. मात्र, तो प्रयत्न हाणून पाडला. असा दावा कर्मचाऱ्यांनी केला होता. तर प्रशासनाने त्याचे खंडन केले होते. त्यावर, प्रशासनाने कितीही नाकारले तरी सत्य नाकारता येणार नाही. असे सांगत कर्मचाऱ्यांची एकजूट असून, काही झाले तरी सरकारला संप मोडीत काढू दिला जाणार नाही. असा निर्धार कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला

हेही वाचा: सोनिया वा ममतांच्या नेतृत्वाला हरकत नाही

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बुधवार (ता. १०) पासून खासगी बसची वाहतूक एसटी स्थानकातून सुरू करण्यात आली आहे. या सेवेला दिवाळी संपल्याने पुण्याबाहेर जाणाऱ्या आणि बाहेरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची गर्दी असल्याने चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मात्र एसटीने खासगी ठेकेदारांच्या शिवशाही आणि शिवनेरी या बस मार्गावर उतरवल्याने आणि प्रवाशांची गर्दी कमी झाल्याने खासगी बसच्या संख्येत घट झाली, असल्याचे राज्य प्रवासी व माल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी सांगितले.

एसटीने शिवशाही आणि शिवनेरी या बस गाड्या मार्गावर आणल्याने दिवसाला धावणाऱ्या दोनशेहून अधिक खासगी बसच्या संख्येत घट होऊन आता १५० बस धावत आहेत. तर ऑल इंडिया परमिटच्या २ हजार बस धावत होत्या. त्यात घट होऊन १ हजार २०० गाड्या धावत आहेत. स्थानकावरील प्रवाशांना आणि बस चालकांना एजंटांकडून त्रास होत होता.

हेही वाचा: जळगाव : वैज्ञानिक होण्यासाठी मोठ्या शिक्षणाची गरज नाही

खासगी बस चालकांनी साधी बस आणि निमआराम बस या गाड्यांच्या प्रवास भाड्यातील फरकामुळे वाढ केली, असा समज प्रवाशांचा होत असल्याने ते वाद घालतात. असे वाद होऊ नये यासाठी शासनाने ठरवून दिलेले दर बसच्या काचेवर लिहिले असून भाडे पत्रक स्थानकावर लावले आहे.

दिवाळीनंतर पुण्यातून बाहेर जाणारी गर्दी आणि बाहेरून पुण्यात येणारी गर्दी कमी झाली असली तरी नियमित प्रवाशांची काही प्रमाणात गर्दी आहेच. शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यातील स्थानकावर नोडल अधिकारी नेमल्याने ते अधिक सोयीचे ठरत आहे. काही प्रवाशांच्या तक्रारी असतील तर त्यांच्याकडे थेट करता येतात. असे शिंदे यांनी सांगितले.

loading image
go to top