%20-%20Copy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20-%20Copy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहरातील तीन पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे प्रभारी आता पदोन्नतीच्या यादीत आहेत. त्यांच्या पदोन्नतीचा आदेश काही दिवसांत निघेल. दुसरीकडे विजापूर नाका व सलगर वस्ती पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचा कार्यकाळ दोन महिन्यांपूर्वीच संपला आहे.
काही दिवसांत या पोलिस ठाण्यांना नवे प्रभारी मिळतील, असे बोलले जात आहे. फौजदार चावडी पोलिस ठाण्यामध्येही नवा अधिकारी येऊ शकतो. तेथील पोलिस निरीक्षक तानाजी दराडे सेवानिवृत्त झाले आहेत. सोलापूर शहरात विजापूर नाका, सलगर वस्ती, फौजदार चावडी, जोडभावी पेठ, जेलरोड, एमआयडीसी व सदर बझार अशी सात पोलिस ठाणी आहेत. दोन दिवसांपूर्वी एकाच ठिकाणी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या २०० अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. त्यावेळी अनेकांनी आमदार, खासदारांकडून वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न केला. पण, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमांनुसार रिक्त ठिकाणी त्या अंमलदारांना नेमणूक दिली. आता विजापूर नाका, एमआयडीसी, सलगर वस्ती पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचा दोन वर्षांचा कार्यकाळ संपला आहे.
‘एमआयडीसी’चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून त्यांची सेवानिवृत्तीही सहा महिन्यांवर आहे. त्यामुळे पदोन्नतीपर्यंत तेथील प्रभारी तेच राहू शकतात. विजापूर नाका व सलगर वस्ती पोलिस ठाण्यांचे प्रभारी बदलतील, पण दोघांनाही चांगल्या ठिकाणी नेमणूक मिळू शकते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी सदर बझार पोलिस ठाण्यांचा पदभार स्वीकारून ८ जुलैला एक वर्ष पूर्ण होईल. पण, तेही पदोन्नतीच्या यादीत असल्याने पुढे या ठिकाणी नवा प्रभारी दिसू शकतो. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांचेही प्रमोशन आहे. त्यामुळे या विभागाचाही प्रभारी बदलणार आहे. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत हेही पदोन्नतीच्या यादीत आहेत. त्यांनी पदोन्नती नाकारल्यास काही महिने त्यांना तेथेच काम करण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा आहे.
दराडे यांना पदोन्नती; दुसऱ्याच दिवशी सेवानिवृत्ती
१९९१ मध्ये पोलिस हवालदार म्हणून सेवेत रुजू झालेले तानाजी दराडे यांनी १९९८ मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षकपद मिळविले. त्यांनी नागपूर शहर, पुणे शहर, परभणी, परळी ग्रामीण, शिरूर (बीड), आनंदनगर, तुळजापूर, कळंब आणि सोलापूर शहर आदी ठिकाणी सुमारे ३५ वर्षे सेवा बजावली. त्यांना २००९ मध्ये सहायक पोलिस निरीक्षकपदी, तर २०१६ मध्ये पोलिस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली होती. त्यानंतर सुमारे साडेनऊ वर्षांनी त्यांना पोलिस उपअधीक्षकपदी पदोन्नती मिळाली. मात्र २९ मे रोजी पदोन्नती मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ पार पडला. त्यामुळे पदोन्नतीचा आनंद त्यांना अवघ्या एका दिवसापुरताच अनुभवता आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.