

सोलापूर : शहरातील सर्व रस्ते, चौक, बाजारपेठा, अशा सर्वच ठिकाणी ऑटोरिक्षांची वर्दळ वाढली आहे. सोलापूर आरटीओ कार्यालयाकडे सध्या १७ हजार ऑटोरिक्षा नोंदणीकृत असून त्यातील अंदाजे १३ हजार रिक्षा सोलापूर शहरातून धावतात. मोठ्या शहरांच्या तुलनेत सोलापुरात रिक्षांचे प्रमाण खूपच जास्त आहे. या पार्श्वभूमीवर नव्या ऑटोरिक्षांना परवाने देणे बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव आरटीओ कार्यालयाने परिवहन आयुक्तालयाकडे पाठविला आहे.
शासनाच्या १७ जुलै २०१७ च्या निर्णयानुसार सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनी किंवा संघटित क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत किंवा उद्योगात नोकरी करणाऱ्यांना ऑटोरिक्षाचे परमिट तथा परवाना घेता येत नाही. तरीदेखील, अशा शेकडो लोकांनी ऑटोरिक्षाचे परवाने घेऊन इतरांना रिक्षा भाडे तत्त्वावर चालवायला दिल्या आहेत. सोलापूर शहरात दरमहा सरासरी ५० ते ५५ रिक्षा वाढत असल्याचे सोलापूर आरटीओ कार्यालयातील आकडेवारीतून दिसून येते. या पार्श्वभूमीवर आता शासन निर्णय डावलून ज्या व्यक्तींनी किंवा नोकरदारांनी ऑटोरिक्षांचे परवाने घेतले आहेत, त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत ते स्वत:हून परत करायचे आहेत. त्यानंतर आरटीओ कार्यालयाकडून स्वतंत्र पथके नेमून प्रत्येक ऑटोरिक्षाच्या मूळ मालकाचा शोध घेऊन त्याची पडताळणी केली जाणार आहे. त्यावेळी मुदतीत परवाना जमा न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन त्याचा परवाना जागेवरच रद्द केला जाणार आहे. याशिवाय वेळप्रसंगी आरटीओचे अधिकारी संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, नव्या रिक्षांना परवाने देणे बंद करण्यासंदर्भातील प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने परिवहन आयुक्तालयास पाठविला आहे. त्यावर आगामी काही दिवसांत धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे.
शासन निर्णयानुसार अपात्र असलेल्यांनी परवाने परत करावेत
शासनाच्या निर्णयानुसार ऑटोरिक्षाचे परमिट घेणारा अर्जदार सरकारी-निमसरकारी, खासगी कंपनी किंवा संघटित क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत, उद्योगात नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार अशा ज्या घटकांकडे ऑटोरिक्षाचे परमिट (परवाना) आहे, त्यांनी स्वत:हून १५ फेब्रुवारीपर्यंत ते परमिट स्वेच्छेने जमा करणे आवश्यक आहे. त्यानंतर विशेष पथके नेमून ऑटोरिक्षांच्या परमिटची पडताळणी केली जाईल.
- गजानन नेरपगार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
सोलापुरातील ऑटोरिक्षांची सद्य:स्थिती
नोंदणीकृत ऑटोरिक्षा
१६,९७३
शहरात धावणाऱ्या अंदाजे रिक्षा
१२,९००
परमिट जमा करण्याची मुदत
१५ फेब्रुवारीपर्यंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.