
सोलापूर : पुन्नू चव्हाण खून प्रकरण; सहा जणांचा जामीन मंजूर
सोलापूर - तू वाळू कुठून आणलीस, तू माझ्या विरोधात ग्रामपंचायतीत का उभारलीस, म्हणून संशयित आरोपींनी अचलेर (ता. अक्कलकोट) येथील सोमलाबाई, पुन्नू चव्हाण, पिंटू चव्हाण यांना काठीने व दगडाने मारहाण केली होती. १७ दिवसांनी पुन्नूचा मृत्यू झाला. या प्रकरणातील सहा संशयित आरोपींना जामीन मंजूर झाला असून, एकाचा जामीन नामंजूर झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक विरोधात लढली म्हणून सचिन निलू राठोड, देविदास निलू राठोड, महादेवी रवींद्र राठोड, अनिल पेमू राठोड, रवींद्र निलू राठोड, ललिता देविदास पवार (सर्वजण रा. अचलेर, ता. अक्कलकोट) यांनी ११ एप्रिल २०२१ रोजी सोमलाबाई चव्हाण व पुन्नू या दोघांना मारहाण केली. त्यानंतर २८ एप्रिल २०२१ रोजी पुन्नूच्या पोटात व छातीत दुखू लागल्याने त्यास सरकारी दवाखान्यात दाखल केले. पण, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपींनी ॲड. मिलिंद थोबडे यांच्यावतीने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला.
घटनेनंतर जवळपास १७ दिवसांनंतर पुन्नूचा मृत्यू झाला असून आता गुन्ह्याचा तपास पूर्णत्वात आलेला आहे, असा युक्तिवाद ॲड. थोबडे यांनी मांडला. त्यावर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी निलू राठोड वगळता सर्व संशयित आरोपींना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपींतर्फे ॲड. थोबडे, ॲड. विनोद सूर्यवंशी, ॲड. सतीश शेटे, सरकारतर्फे ॲड. दत्ता पवार तर फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले.
Web Title: Punnu Chavan Murder Case Bail Granted To Six Persons
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..