esakal | रेल्वेचे 57 आयसोलेशन कोच सोलापुरात दाखल ! इमर्जन्सी 513 बेड सेटअप
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Isolation

रेल्वेचे 57 आयसोलेशन कोच सोलापुरात दाखल ! इमर्जन्सी 513 बेड सेटअप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेकडून बोगीत आयसोलेशन वॉर्डच्या निर्मितीसाठी 57 कोच दाखल झाले आहेत. यामध्ये 513 रुग्णांची व्यवस्था होणार असून, याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

देशात कोरोना महामारीमुळे 23 मार्च 2020 पासून लॉकडाउन करण्यात आला होता. त्या दिवसापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत गेली. वाढती रुग्णसंख्या पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगीत आयसोलेशन कोच बनविले होते. मात्र मागील वर्षी या कोचचा वापर झाला नाही. मागील वर्षी तयार करण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोच वापराविना धूळखात पडून होते. मागील वर्षी तयार केलेले कोच सोलापूर विभागात आणि अन्य ठिकाणी आहे तशाच स्थितीत ठेवण्यात आलेले आहेत. सर्व डबे एकत्र करून डब्यांची पाहणी करण्यात येणार आहे. तर काही डब्यांची दुरुस्ती करून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी दिले जाणार आहेत.

शहरातील हॉस्पिटल्समधील बेडची संख्या कमी पडत असल्याने रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा त्या कोचची तयारी सुरू केली आहे. सोलापूर विभागात देखील मागील वर्षी पंढरपूर, कलबुर्गी, दौंड आदी ठिकाणी तयार करण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोच ठेवण्यात आले होते.

ठळक बाबी...

  • एका कोचमध्ये नऊ रुग्णांवर होणार उपचार

  • सोलापूरमधील हॉस्पिटल्सवरील भार होणार कमी

  • ऑक्‍सिजन ठेवण्याची असणार सोय

  • प्रत्येक डब्यात स्वच्छतागृह असणार

  • प्रत्येक वॉर्डसमोर प्लास्टिकचे पडदे असतील

  • बाथरूमच्या सोयीत बादली, मग, साबण असेल

  • डॉक्‍टरांना बसण्यासाठी स्वतंत्र असणार सोय

सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे सोलापूर विभागात विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोच एकत्र करण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.

मागील वर्षी रेल्वेच्या डब्यांमध्ये आयसोलेशन कोच बनविले होते. मात्र तयार करण्यात आलेल्या कोचचा वापर झाला नसल्याने ते सोलापूर विभागात विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. काही कोच तयार अवस्थेत आहेत तर काहींचे काम केले जाणार आहे.

- शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, सोलापूर

बातमीदार : विजय थोरात