
सर्वसामान्यांच्या लेकीबाळांचे विवाह जमविण्यापासून ते सोळाव्यापर्यंत जातीने हजर राहणारे, अगदी पती-पत्नींमधील वादापासून ते शेतीच्या
बांधापर्यंतची सर्व भांडणे समोपचाराने सोडविणारे, व्यसन, जाती-भेद, आदींपासून गावास चारहात लांब ठेवणारे, अबालवृद्धांमध्ये सहज मिसळणारे, गावातील प्रत्येकाने आपला कुटुंबप्रमुख म्हणून मान्यता दिलेले सर्वसामान्यांचे आधारवड राजूबापू पाटील यांचे 13 ऑगष्ट रोजी अचानक निधन झाल्याची बातमी आली आणि लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला. आज तीन आठवड्यानंतरही भोसे पंचक्रोशीत राजुबापूंच्या आठवणींमध्ये लोक अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. आज पितृपंधरवड्यानिमित्त त्यांचे स्मरण करताना देव हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सर्वासामान्यांचे आधारवड : राजूबापू पाटील
(कै.) यशवंतभाऊ पाटील यांच्या छत्रछायेखाली भोसे गावचे सरपंच म्हणून राजकीय वाटचाल केलेल्या राजूबापू पाटील यांनी पुढे सोलापूर जिल्हा परीषदेचे कृषी व पशुसंवर्धन समितिचे सभापती, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या समन्वय समितीचे सदस्य, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक, रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य व जिल्हा कार्याध्यक्ष अशा अनेक विविध पदांवर काम केले. यादरम्यान त्यांनी युवकांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून विक्रमी 90 व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले. त्यातही गावात सर्व प्रकारचे उद्योगधंदे चालू व्हावे, या दृष्टीकोनातून एका उद्योगासाठी कमाल दोघांनाच गाळे दिले. उद्योग चालू करण्यासाठी आर्थिक तरतूद व्हावी, म्हणून 1990 साली पतसंस्था काढून त्या माध्यमातून युवकांच्या हाताला काम दिले. आज ही पतसंस्था संपूर्ण संगणीकृत असून जिल्ह्यातील अग्रनामांकित पतसंस्था म्हणून ओळखली जाते. 2004 मध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती पदाच्या वेळी भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले. काळाची गरज ओळखून त्यावेळी जलसंधारणाच्या कामांना महत्त्व देत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केले.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांना काम देताना एकाही मजुराचे स्थलांतर होवू दिले नाही. सात सिमेंटच्या बंधाऱ्यांची निर्मिती करतानाच मतदारसंघातील अनेक तळ्यातील गाळ काढून घेतला. अनेक वेळा लोकांच्या आडमुठ्या धोरणामुळे साईट मिळत नव्हत्या तेव्हा दिवस-दिवसभर साईटवर थांबून लोकांची समजूत काढून जलसंधारणाचे महत्त्व पटवून देत काम करून घेतले. यातले बरेचशे काम श्रमदानातूनही केले आहे. पुढे पाऊस पडल्यावर या कामाचे महत्त्व लोकांना कळले. सध्याची जलयुक्त शिवार योजना खऱ्या अर्थाने त्यावेळी राजूबापूंनी राबविली होती.
बादलकोट येथील पारधी समाजाच्या 28 कुटुंबांना एकाच वेळी घरकुल योजनेचा लाभ देताना नविन "सिमला नगर' वसविले. नंतर माढा तालुक्यात पारधी समाजाचे झालेले जळीतकांड पाहिले तेव्हा खऱ्या अर्थाने या कामाचे महत्त्व समजले. ही घरे बांधत असताना निधी कमी पडत होता. तेव्हा काही पदरचा निधी त्यात घालून घरे बांधून देण्याचे काम स्वतःच करुन दिले. या कामाचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी देवकर यांनीही कौतुक केले होते. जिल्ह्यातील युवकांना शेतीत नवनवीन प्रयोग करण्यास प्रोत्साहन मिळावे व शेतीविषयी सकारात्मक भावना व आवड निर्माण व्हावी म्हणून त्यावेळी जिल्हा परिषदेमार्फत बी.एस्सी ऍग्री पदवी घेतलेल्या तरुणांसाठी कार्यशाळांचे आयोजन केले होते. पिक विमा योजनेचा शंभर टक्के शेतकऱ्यांना फायदा मिळवून दिला होता. जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नूतनीकरण करुन घेतले होते.
सामाजिक कार्य
राजूबापूंनी आपल्या संपूर्ण हयातील दररोज सकाळी नऊ ते बारा हे तीन तास जनतेसाठी राखून ठेवलेले होते. यावेळेत गावातील सर्व वाद गावातच मिटविले जात. पोलिस ठाण्यात शक्यतो कोणी जात नव्हते. बापूंचा शब्द प्रमाण मानून न्याय स्वीकारला जायचा.
विशेष म्हणजे त्यांचेकडे आलेल्या वादातील दोन्ही बाजुंच्या लोकांचे समाधान होईल असा न्यायनिवाडा करण्याची अद्भूत कला त्यांच्याकडे होती. गावात सर्व जातींच्या व बेटांच्या वेगवेगळ्या असणाऱ्या स्मशानभूमीचे एकत्रीकरण करण्याचे राजूबापुंनी केलेले ऐतिहासिक काम हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे. यातूनच गावात नवीन खरेदी केलेल्या दुचाकी, कार, जीप पासून ते ट्रॅक्टर, जेसीबी पर्यंतच्या कोणत्याही वाहनाची बापूंच्या हस्ते पुजा झाल्याशिवाय खरेदीदारास नवीन वाहन खरेदी केल्याचे समाधान मिळत नव्हते.
राजूबापूंनी शरद पवार माढ्याचे खासदार असताना करकंब-भोसे परिसरातील विजेचा प्रश्न त्यांच्याकडे मांडला. नंतर त्यांनी करमाळा येथे बैठक लावून त्यांना आवर्जून आमंत्रित करुन घेतले व विजेची सद्य परिस्थिती मांडण्यास सांगितले. तेव्हा गांभिर्य लक्षात घेवून शरद पवार यांनी तातडीने तीन एमव्हीचे सर्व ट्रान्स्फार्मर पाच एमव्हीचे बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. उजनीच्या हक्काच्या पाण्यासाठी कायम लढा देतानाच लोकांमध्ये पाण्याविषयी जनजागृतिही त्यांनी केली. सहा पाणीवापर संस्था स्थापन करून लोकांना वळण लावले. एवढेच नाही तर दुष्काळी परिस्थितीत या पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून पन्नास टक्के पाणीपट्टी शेतकऱ्यांना माफ केली. सोलापूर-पूणे महामार्गावर टेंभुर्णी येथे रास्ता रोको, पंढरपूर रोडवर भोसेपाटी येथे रास्तारोको, डाव्या कालव्यातच धरणे आंदोलन, आदी प्रकारची आंदोलने करुन वेळोवेळी उजनीची आवर्तने मिळविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. शिवाय उजनीतून नदीला पाणी सोडले की ते शेतीसाठी उचलले जावू नये म्हणून वीजपुरवठा खंडित केला जायचा. तसाच प्रकार डाव्या कालव्याच्या बाबतीतही केला जावू लागला होता. पण वेळीच पाठपुरावा करुन तो निर्णय शासनास मागे घ्यायला लावला होता.
सन 2012 साली गावास तंटामुक्तीचा सात लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. तेव्हाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून हा पैसा जलसंधारणाच्या कामावर खर्च करण्याचा निर्णय राजूबापूंनी ग्रामस्थांच्या सहकार्याने घेतला. तेव्हा गावच्या ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण करुन साखळी पद्धतीने सात सिमेंटचे बंधारे बांधून घेतले. याकामी लोकांनीही साथ देताना स्वतःचे ट्रॅक्टर, जेसीबी मोफत उपलब्ध करुन दिले. परिणामी फक्त डिझेलसाठीच पैसा खर्च करावा लागला. या कामाचे सरकारी पद्धतीने मूल्य काढले तेव्हा ते चक्क एक कोटीच्या आसपास जात असल्याचे लक्षात आले. नंतर या ओढ्याच्या दुतर्फा झाडेही लावून परिसर समृद्ध करण्याचे काम राजूबापूंनी केले. दुष्काळी परिस्थितीतही त्यांनी शासनाची वाट न पाहता कारखाना व सोसायटीच्या माध्यमातून वाड्या-वस्त्यांवर पाण्याच्या टाक्यांचे वाटप कारून टॅंकरने पणीपुरवठा चालू केला होता. याच कारणाने बापू म्हणजे आपल्यासाठी साक्षात देव असल्याची भावना लोकांची होती.
राजूबापूंनी नोव्हेंबर 1996 मध्ये विविध कार्यकारी सेवा सोसायटी नंबर 2 ची स्थापना केली आणि पहिल्याच वर्षी महाराष्ट्रात पहिल्यांदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत डिव्हिडंड वाटपाचे काम झाले. शेतीत वरचेवर होणारे बदल शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्यासारख्या अनेक तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने त्यांनी आयोजित केली होती. "कमवा व शिका' या योजनेतून गोरगरीब विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करताना शेकडो मुलांना "नुपिन' कंपनीत पाठविले. गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचे स्वरुप काळानुरुप बदलून त्यात कर्तुत्ववान ऐतिहासिक व्यक्तींचे चरित्र उलगडून दाखविण्याचा अनोखा प्रयत्न राजूबापूंनी केला.
शैक्षणिक कार्य
रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्यपदावरुन काम करताना अनेक धोरणात्मक निर्णय बापूंनी घेतले होते. ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी भोसे येथे सिनिअर कॉलेज चालू केले. "सकाळ'तर्फे घेण्यात आलेल्या यिन निवडणुकीत पहिल्याच वर्षी याच कॉलेजचा युवराज रणदिवे जिल्हा अध्यक्ष बनला होता. गावातील रयतच्या यशवंत माध्यमिक विद्यालयात त्यांनी चालू केलेली गुरुकुल पद्धत ही येथील शिक्षणातील एक मैलाचा दगड ठरली आहे. शिवाय निवासी उन्हाळी वर्गाची व्यवस्था करुन विध्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर करण्याचा त्यांचा प्रयत्नही वाखाणण्याजोगाच आहे. गावातील सर्व दहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची दोन्ही सत्रात एकत्रित पालक सभा घेवून गुणवत्तेचा व अडी-अडचणींचा आढावा राजूबापूंकडून घेतला जायचा. यावेळी शिक्षकांनी स्वतः विध्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारुन काम करण्यासाठी त्यांच्याकडून प्रोत्साहन दिले जायचे.
संपादन : अरविंद मोटे