esakal | रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या "रेमडेसिव्हीर'चा कच्चा माल तयार होतोय सोलापुरात !
sakal

बोलून बातमी शोधा

रेमडेसिव्हीर इंजेक्शन

रुग्णांसाठी संजीवनी ठरणाऱ्या "रेमडेसिव्हीर'चा कच्चा माल तयार होतोय सोलापुरात !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात या रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवतोय. कोरोनावर प्रभावी ठरत असलेल्या या रेमडेसिव्हीर इंजेक्‍शनसाठी लागणारा काही कच्चा माल सोलापुरात तयार होतोय.

सोलापुरातील बालाजी अमाईन्स या कंपनीत रेमडेसिव्हीरसाठी लागणारे दोन सॉल्व्हंट आणि एक कच्चा माल तयार होतोय. या इंजेक्‍शनसाठी जवळपास 27 घटकांची गरज असते. त्यापैकी ट्रायइथाईल अमाईन (टीईफ), डायमिथाईल फार्मामाईड (डीएमएफ), असिटोनायट्रायल या तीन प्रमुख कच्च्या मालाची निर्मिती बालाजी अमाईन्स करत आहे. रेमडेसिव्हीरचा कच्चा माल तयार करण्यासाठी प्रामुख्याने इथेनॉलचा वापर होतो. मिथेनॉल अमोनिया, इथेनॉल अमोनिया, ऍसिटिक ऍसिड आणि ऑक्‍सिजनचा वापर या कच्च्या घटकांचा उपयोग रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन निर्मितीसाठी केला जातो.

यातील काही घटक हे महाराष्टातूनच मागवले जातात, मात्र काही घटक हे परदेशातून मागवाव्या लागत असल्याची माहिती बालाजी अमाईन्सचे प्रमुख राम रेड्डी यांनी दिली. विशेष म्हणजे, रेमडेसिव्हीरसाठी लागणारा डायमिथाईल फार्मामाईड हे अमाईन्स संपूर्ण देशात केवळ सोलापुरात तयार होते. त्यामुळे रेमडेसिव्हीर तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांना बालाजी अमाईन्स हा कच्चा माल पुरवत आहे. दरम्यान, रेमडेसिव्हीरची मागणी पाहता बालाजी अमाईन्सचे विस्तारीकरण देखील करण्यात येणार आहे.

पुढील एक-दोन आठवड्यात होऊ शकतो रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत

याबाबत बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी म्हणाले, रेमडेसिव्हीरचा तुटवडा जाणवत आहे हे खरे आहे. गेल्या वर्षी जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा कंपन्यांनी रेमडेसिव्हीरचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले होते. कारण, रेमडेसिव्हीरचा वापर कोरोना रुग्णांसाठीच केला जात असतो. परंतु, मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कंपन्यांनी रेमडेसिव्हीरची निर्मिती कमी केली होती. आता मागील दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरवात झाली आहे. त्यामुळे अचानक पुन्हा रेमडेसिव्हीरला मागणी वाढली आहे. त्यामुळे दोन - तीन मॅन्युफॅक्‍चरिंग कंपन्यांनी आता पुन्हा रेमडेसिव्हीरची पुनर्निर्मिती सुरू केली आहे. त्यामुळे पुढील दोन- तीन आठवड्यात हे शॉर्टेज पूर्णपणे कमी होईल. आणि देशातील रुग्णांपर्यंत रेमडेसिव्हीर पोचतील, असं मला वाटतंय. रेमडेसिव्हीरसाठी पंधरा ते सोळा कच्चे घटक लागतात त्यापैकी तीन घटक बालाजी अमाईन्समध्ये तयार होतात.

- राम रेड्डी, व्यवस्थापकीय संचालक, बालाजी अमाईन्स

बातमीदार : विश्‍वभूषण लिमये