esakal | चोरट्याने दुकानातून पळविले काजू, बदाम अन्‌ खाद्यतेल! वाचा सोलापुरातील गुन्हेगारी
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापुरातील गुन्हेगारी

हैदराबाद रोडवरील स्वागत नगराजवळील तुळजाई भोसले नगरातील इस्माईल गुलाब बागवान यांच्या दुकानातून चोरट्याने 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Solapur : चोरट्याने दुकानातून पळविले काजू, बदाम अन्‌ खाद्यतेल!

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : हैदराबाद रोडवरील (Hyderabad Road, Solapur) स्वागत नगराजवळील तुळजाई भोसले नगरातील इस्माईल गुलाब बागवान यांच्या दुकानातून चोरट्याने 30 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. 1) रात्री दहा ते शनिवारी सकाळी दहा या वेळेत घडली. बागवान यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद (Crime) दिली आहे. दुकानाचे कुलूप तोडून चोरट्याने तीन किलो बदाम, तीन किलो काजू, डाळीचे कट्टे, खाद्यतेल, तेलाच्या पिशवीचा बॉक्‍स, बिस्किट बॉक्‍स आणि पाच हजारांची रोकड चोरली आहे. पुढील तपास पोलिस नाईक काळेल हे करीत आहेत.

माहेरून पैसे आण म्हणून विवाहितेचा छळ

माहेरून एक लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला नांदवणार नाही म्हणून सासरच्यांनी छळ केला, अशी फिर्याद अश्‍विनी रवी चव्हाण (रा. न्यू रंगराज नगर, जुना विडी घरकुल) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरून पती रवी शंकर चव्हाण याच्यासह विमलाबाई शंकर चव्हाण, शंकर चव्हाण (सर्वजण रा. न्यू रंगरेज नगर, जुना विडी घरकुल) आणि रचना भारत पवार (रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, 2018 पासून आजपर्यंत सासरच्यांनी माहेरून पैसे आण म्हणून छळ केला. तुला पटत नसेल तर नवऱ्याला सोडून दे, नाहीतर माहेरून एक लाख रुपये आण, पुन्हा दिसलीस तर याद राख, अशी दमदाटीही सासरच्यांनी केली, असे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करीत आहेत.

हेही वाचा: ''महापालिका निवडणुकीत समविचारी पक्षांशी रिपाइंची आघाडी''

वहिनीचा विनयभंग; डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा

पोटगीची रक्‍कम मागण्यासाठी पतीकडे गेल्यानंतर महिलेला मारहाण करून डॉक्‍टर असलेल्या दिराने विनयभंग केला, अशी फिर्याद पीडित महिलेने विजापूर नाका पोलिसांत दिली आहे. तसेच पती व सासूविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हा न्यायालयाने त्या महिलेला पाच हजार रुपये तर कौटुंबिक न्यायालयाने दहा हजारांची पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र, पतीकडून वेळोवेळी पोटगी न मिळाल्याने ती महिला पतीकडे गेली. त्यावेळी तिला शिवीगाळ करून विनयभंग केला, असे फिर्यादीत नमूद आहे. विजापूर नाका पोलिस पुढील तपास करीत आहेत.

धनादेश न वटल्याने अटकेचे आदेश

ढेकळे इंटरप्रायजेसच्या देयापोटी 43 लाख 26 हजार 972 रुपयांचा धनादेश दिला. परंतु, तो बॅंकेत वटलाच नाही. या पार्श्‍वभूमीवर संशयित आरोपी न्यायालयात स्वत:हून हजर न राहिल्यास त्याला अटक करावी, असे आदेश न्यायदंडाधिकारी एम. सी. शेख यांनी दिले आहेत. शेजबाभूळगाव (ता. मोहोळ) येथील तानाजी दगडू गुंड-पाटील याने ढेकळे इंटरप्रायजेसचे मालक ब्रह्मदेव ज्ञानोबा ढेकळे यांच्याकडून उधारीवर माल घेतला. मालाच्या देयापोटी तानाजी गुंड-पाटील याने ढेकळे यांना धनादेश दिला. मात्र, तो धनादेश वटलाच नाही. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. हा खटला न्यायालयात सुरू असून गुंड-पाटील हा न्यायालयात हजर झाला नाही. त्यामुळे ढेकळे यांनी मोहोळ न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. या प्रकरणी ढेकळे इंटरप्रायजेसच्या वतीने ऍड. अरविंद अंदोरे, ऍड. रजनी बोमने, ऍड. सारिका अग्निहोत्री, ऍड. खुशी कडेचूर, ऍड. महेश लालसरे, ऍड. रवी गजधाने हे तर संशयित आरोपीतर्फे ऍड. प्रवीण शेंडे हे काम पाहत आहेत.

युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्‍वर टोल नाक्‍याजवळील प्रियंका पेट्रोलियम सर्व्हिसेसच्या नावे स्वप्निल मुत्तूर यांनी पंप चालवायला घेतला होता. फिर्यादीच्या बहिणीचा विवाह असल्याने पेट्रोल पंपाकडे लक्ष द्यायला मुत्तूर यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांचे नातेवाईक मनीष अजय काळजे याच्याकडे कराराद्वारे तो पंप चालवायला दिला. त्यानंतर मुत्तूर यांनी त्याच्याकडे हिशेब मागितला. मात्र, त्याने हिशेब दिलाच नाही. या व्यवहारात आठ लाख 46 हजार रुपयांची फसवणूक केली, अशी फिर्याद मुत्तूर यांनी मोहोळ पोलिसांत दिली. त्यानुसार काळजेविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अटकेच्या भीतीने काळजे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. परंतु, ऍड. शशी कुलकर्णी, ऍड. प्रशांत नवगिरे यांनी त्यासाठी हरकत घेत प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने काळजेचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

अपघाती मृत्यूप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कुबोटा शोरूमजवळून रस्ता ओलांडताना महिबूब बाबूलाल शेख (रा. वारद नगर, मडकी वस्ती) यांना दुचाकीने (एमएच 13, डीआर 7126) धडक दिली. या अपघातात महिबूब शेख यांच्या कानाला व पायाला जबर दुखापत झाली. दरम्यान, अपघाताची खबर पोलिसांना न देता आणि जखमीला उपचारासाठी घेऊन न जाता दुचाकीस्वार तिथून पसार झाला. या अपघातात महिबूब शेख यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या मृत्यूला दुचाकीस्वार जबाबदार असल्याची फिर्याद शमशोद्दीन महिबूब शेख यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मंडले हे करीत आहेत.

हेही वाचा: ''राफेल खरेदी ही शौर्याची नव्हे तर लाजीरवाणी बाब !''

दोन हजारांसाठी लोखंडी विळ्याने मारहाण

येथील बाळू हळवे यांचे दोन हजार रुपये आताच्या आता दे म्हणून सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर भैय्या आवटे याने त्याच्याकडील लोखंडी विळ्याने मारून जखमी केले. या मारहाणीत आठ टाके पडल्याची फिर्याद अमोल मल्लिनाथ सोलनगर (रा. औसे वस्ती, आमराई) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. या प्रकरणी माधव आवटे व त्याचे तीन साथीदार, नवनाथ श्रीरंग आवटे, भैय्या महादेव आवटे व सागर महादेव आवटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक खान हे पुढील तपास करीत आहेत.

loading image
go to top