थिटे दाम्पत्याची कमाल ! सव्वा एकरात घेतले कांद्याचे 25 टन उत्पादन

अनगर येथील थिटे कुटुंबाने घेतले कांद्याचे विक्रमी उत्पादन
Onions
OnionsCanva

अनगर (सोलापूर) : अनगर (ता. मोहोळ) (Modhl) येथील उच्च विद्याविभूषित एमएस्सी, पीएचडीप्राप्त डॉ. नित्यानंद थिटे (Dr. Nityanand Thite) व त्यांच्या एमए सेट प्राध्यापक असणाऱ्या पत्नी स्वाती थिटे (Pro. Swati Thite) या दाम्पत्याने आपल्या वडिलोपार्जित शेतीत नेटक्‍या नियोजनातून कमी खर्चात व कमी कालावधीत कोरोनाच्या महामारीत वेळेचा सदुपयोग करीत नावीन्यपूर्ण पण फायदेशीर प्रयोग करत शेती कसण्याला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यांनी साडेतीन ते चार महिन्यांच्या कालावधीत सव्वा एकरात उन्हाळी कांद्याचे (Onion) विक्रमी 25 टन उत्पादन घेतले आहे. दरम्यान, कांद्याला सध्या भावच नसल्याने हा कांदा त्यांनी अत्याधुनिक पद्धतीने कांदा चाळ उभारून त्यात साठवून ठेवला आहे. (Record production of onions by the Thite family at Anagar at Mohol taluka)

असे घेतले उत्पादन

याविषयी अधिक माहिती देताना डॉ. थिटे यांनी सांगितले, की एकूण क्षेत्रापैकी सव्वा एकरामध्ये मशागतीनंतर पाच ट्रॉली शेणखत पसरून टाकला. रेन पाइपच्या साहाय्याने सर्व क्षेत्र भिजवून घेऊन वाफशावर फुरसुंगी कांद्याच्या तीन किलो बियाणांची पेरणी उपळाई (ता. माढा) येथील कांदा पेरणी तज्ज्ञ शेतकरी सागर माळी यांच्याकडून केली. पेरणीनंतर 21 दिवसांनी तणनाशक विप सुपर व कांदा मोठा होण्यासाठी गोलची फवारणी केली. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने मजुरांकरवी खुरपणी करून घेतली.

Onions
"ओन्ली बेड अँड हॉस्पिटल !' व्हॉट्‌सऍप ग्रुपने वाचवले अनेक कोरोना रुग्णांचे प्राण

यानंतर मिश्र खतांच्या चार पिशव्या, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या दोन पिशव्या, पांढरे पोटॅश पावडरच्या दोन पिशव्या, याबरोबरच केरन या सेंद्रिय तंत्रज्ञानाचा वापर करत कांद्याला रेन पाइपचा वापर करत प्रत्येक वेळी फक्त रात्रीच पाणी दिले. द्रवामधून फॉस्फरस व पोटॅश सोडले. रासायनिक खते, सेंद्रिय तंत्रज्ञान व शेणखत या त्रिसूत्रीचा वापर, कीटकनाशक, बुरशीनाशकाची एकदाच फवारणी करूनही कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव कांद्यावर झाला नाही. कांद्याला रात्री मोजकेच गरजेएवढे रेन पाइपने पावसाप्रमाणे पाणी दिल्याने कांदा तिखट न होता त्याला आकर्षक गोलाई, आकर्षक गुलाबी रंग येऊन पीक जोमदार आल्याने विक्रमी भरघोस उत्पादन मिळाले.

सध्या दर नसल्याने आधुनिक कांदा चाळीत साठवला कांदा

पेरणीनंतर साडेतीन ते चार महिन्यांत कांदा काढणीस आला आहे. पण त्याला सध्या बाजारपेठेत भाव नसल्याने तो काढून दर वाढेपर्यंत टिकून राहील, अशी आधुनिक कांदा चाळ उभारून त्यात तो साठविला आहे. कांद्याच्या काढणीनंतर जमिनीत बेऊड (सुपीकता) तयार होत असल्याने शेतकऱ्यांनी वर्षातून एकदा तरी कांद्याचे पीक घ्यावे. यासाठी आम्हाला माझे मामा कृषिभूषण दादा बोडके यांचे मार्गदर्शन व सुहास पासले, प्रकाश थिटे, कांदा बीज उत्पादक शेतकरी अनिल गवळी यांचे सहकार्य मिळाले, असे डॉ. नित्यानंद थिटे यांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये उन्हाळी, पुणे फुरसुंगी कांदा पेरल्याने यामध्ये माझी मोठी बचत झाली. रेन पाइपने तो भिजविल्याने त्यामध्ये तण जास्त न येता माल मोठा झाला. कांदा हा जीवनावश्‍यक घटकांमध्ये येत असल्याने शेतकऱ्यांना परवडेल असा दर राहण्यासाठी त्यावर सरकारचे नियंत्रण हवे, तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडेल.

- डॉ. नित्यानंद थिटे, कांदा उत्पादक शेतकरी, अनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com