esakal | रेमडेसिव्हिरसाठी हेलपाटे ! जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक; इंजेक्‍शन कुठे मिळते हेच माहिती नाही

बोलून बातमी शोधा

34Rem (1).jpeg

अन्न-औषध प्रशासनाचे भालेराव म्हणाले...

  • शहरातील 36 तर ग्रामीण भागातील 25 रुग्णालयांमध्ये केले जातात कोरोना रुग्णांवर उपचार
  • संबंधित रुग्णालयाशी संलग्नित मेडिकलमध्येच मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन
  • पुण्यावरून येणार आज एक हजार इंजेक्‍शनचा साठा; मागणीनुसार मिळतील रेमडेसिव्हिर
  • जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हॉस्पिटलमधील डॉक्‍टर व आरोग्याधिकाऱ्यांची बोलावली बैठक
रेमडेसिव्हिरसाठी हेलपाटे ! जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली तातडीची बैठक; इंजेक्‍शन कुठे मिळते हेच माहिती नाही
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच रुग्णांना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनची मागणीही वाढू लागली आहे. दररोज दीड हजारांहून अधिक इंजेक्‍शन लागतात, परंतु जिल्ह्यात तेवढा साठाच शिल्लक नाही. दुसरीकडे हे इंजेक्‍शन नेमके मिळते कुठे आणि त्याची नेमकी किंमत किती, याची माहितीच रुग्णांच्या नातेवाईकांना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इंजेक्‍शनचा काळाबाजार सुरु असल्याचे बोलले जात असून बार्शीत असाच प्रकार उघड झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तातडीची बैठक बोलावली असून त्यातून रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण थांबेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला जात आहे.

एक हजार इंजेक्‍शन आज येतील
पुण्यावरून रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा साठा आज (गुरुवारी) सोलापुरसाठी मिळेल. मूलभूत किंमतीपेक्षा अधिक किंमतीने इंजेक्‍शन विकणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. इंजेक्‍शन नेमके कुठे मिळतील हे स्पष्ट केले जाईल. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठक बोलावली आहे. 
- नामदेव भालेराव, उपायुक्‍त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर

एकिकडे कोरोनावरील प्रतिबंधित लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची ओरड आहे. तर दुसरीकडे रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनच मिळत नसल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. शहरातील 36 रुग्णालयांमधून कोरोना बाधितांवर उपचार केले जात असून काही रुग्णालयाचे बेड यापूर्वीच हाऊसफूल्ल झाले आहेत. काही संशयितांनी टेस्टचा रिपोर्ट येण्यापूर्वीच खासगी रुग्णालयातील बेड बुकिंग करून ठेवल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेचे उपायुक्‍त धनराज पांडे यांनी दवाखान्यांना आवाहन करून असे प्रकार थांबवावेत, असे आवाहन केले आहे. रेमडेसिव्हिर नाही, लस मिळेना आणि बेडही उपलब्ध नाहीत, अशा समस्या असतानाही प्रशासन हातावर हात ठेवून गप्पच बसल्याचा आरोप रुग्णांचे नातेवाईक करू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता जिल्हाधिकारी श्री. शंभरकर हे यांनी बोलवलेल्या बैठकीतून नेमका ठोस मार्ग निघणार का, याची उत्सुकता लागली आहे.

अन्न-औषध प्रशासनाचे भालेराव म्हणाले...

  • शहरातील 36 तर ग्रामीण भागातील 25 रुग्णालयांमध्ये केले जातात कोरोना रुग्णांवर उपचार
  • संबंधित रुग्णालयाशी संलग्नित मेडिकलमध्येच मिळणार रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन
  • पुण्यावरून येणार आज एक हजार इंजेक्‍शनचा साठा; मागणीनुसार मिळतील रेमडेसिव्हिर
  • जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हॉस्पिटलमधील डॉक्‍टर व आरोग्याधिकाऱ्यांची बोलावली बैठक