esakal | कोरोना लसीकरणाचा बट्ट्याबोळ ! शहरातील लस संपली; ग्रामीणमध्ये 35 केंद्रांवरच लसीकरण

बोलून बातमी शोधा

Vaccination
कोरोना लसीकरणाचा बट्ट्याबोळ ! शहरातील लस संपली; ग्रामीणमध्ये 35 केंद्रांवरच लसीकरण
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन कोरोनाचे संकट हद्दपार करण्याच्या हेतूने एकीकडे लसीकरण तर दुसरीकडे कोरोना टेस्टची संख्या वाढविली जात आहे. मात्र, सोलापूर शहर- जिल्ह्यातील 18 वर्षांवरील तब्बल 29 लाख व्यक्‍तींना लस टोचण्याचे उद्दिष्ट असतानाही आतापर्यंत केवळ दोन लाख 98 हजार 740 डोस प्राप्त झाले आहेत. गुरुवारी शहरातील सर्वच केंद्रांवरील लस संपली तर ग्रामीणमध्ये अवघ्या 35 केंद्रांवरच लसीकरण दुपारपर्यंत सुरू राहिल्याचे पाहायला मिळाले. लस संपल्याने अनेकांना तीन-चार तास रांगेत थांबून पुन्हा घरी परतावे लागले.

शहर-जिल्ह्यात कोरोनाचे दररोज सरासरी दीड हजारांपर्यंत रुग्ण आढळत असून त्यापैकी सरासरी 30 ते 35 रुग्णांचा मृत्यू होऊ लागला आहे. अशा परिस्थितीत चिंतेत असलेले ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांवरील व्यक्‍ती लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जात आहेत. त्या ठिकाणी लस टोचून घेण्यासाठी रांगा लागलेल्या असतानाही अनेकांना तासन्‌तास थांबूनही लस मिळत नसल्याची स्थिती शहर- जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरेशी लस मिळेल, असा विश्‍वास प्रशासनाला असतानाही अद्याप वाढीव लस मिळालेली नाही. दररोज 35 हजारांहून अधिक व्यक्‍तींना लस टोचता येईल, एवढे मनुष्यबळ असतानाही एक-दोन दिवसाआड जिल्ह्यासाठी 20 हजार डोससुद्धा मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. 16 जानेवारीपासून आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यासाठी तीन लाख डोसदेखील मिळालेले नाहीत. अनेकदा लस संपल्याने दुपारनंतर केंद्रे बंद करावी लागत आहेत.

हेही वाचा: दहावी परीक्षा रद्दचा काय होणार परिणाम? स्पर्धात्मक युगात गुणवत्तेचा प्रश्‍न ऐरणीवर

लसीकरणाची जिल्ह्याची स्थिती

  • लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट : 29,38,700

  • एकूण नियोजित केंद्रे : 339

  • दररोजची क्षमता : 35,600

  • आतापर्यंत लस मिळाली : 2,98,740

  • सध्या सुरू असलेली केंद्रे : 54

जिल्ह्यातील उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांसह खासगी रुग्णालये आणि शहरातील नागरी आरोग्य केंद्रे व खासगी रुग्णालये आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय अशा एकूण 339 केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याचे नियोजन आहे. मात्र, दरवेळी 60 हजार ते एक लाख डोस देण्याची मागणी करूनही 14 ते 19 हजारांपर्यंत डोस मिळतात. त्यामुळे अनेकांना लस मिळत नसून केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत.

- डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा समन्वयक, लसीकरण, सोलापूर

हेही वाचा: बार्शीत लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड ! सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा; पोलिस बंदोबस्त

लसीकरण केंद्रे सहा दिवसांसाठी हाउसफुल्ल

ग्रामीण भागातील तीन उपजिल्हा रुग्णालये, 12 ग्रामीण रुग्णालये, 74 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 202 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसह 19 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर शहरातील 15 नागरी आरोग्य केंद्रे आणि 13 खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू आहे. दरम्यान, शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या अपुरी असल्याने नागरी आरोग्य केंद्रांवर लाभार्थ्यांची मोठी गर्दी होऊ लागली. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी लाभार्थ्यांनी स्वत:हून ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय लस टोचू नये, असा फतवा काढला. आता नोंदणी करूनही लसीअभावी नागरी आरोग्य केंद्रांची नावेच ऑनलाइन दिसत नाहीत. पुढील सहा-सात दिवसांसाठी ही केंद्रे हाउसफुल्ल झाली असून लस उपलब्ध झाल्याशिवाय अन्य कोणत्याही व्यक्‍तीला नोंदणी करता येणार नाही, असे काही नागरी आरोग्य केंद्रांवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.