सारा गाव मामाचा अन्‌ एकही नाही कामाचा ! बॅंक कॉलनीतील रहिवासी भोगताहेत 35 वर्षांपासून नरकयातना 

bank Colony
bank Colony

सोलापूर : हद्दवाढीनंतर विकासाची अपेक्षा बाळगणाऱ्या मजरेवाडी हद्दीतील ज्ञानेश्‍वर नगर परिसरातील बॅंक कॉलनीतील रहिवाशांना गेल्या 35 वर्षांपासून नरकयातना भोगाव्या लागत आहेत. "सारा गाव मामाचा अन्‌ एक नाही कामाचा' या म्हणीनुसार तीन नगरसेवक असूनही "एकही नाही कामाचा' अशी गत येथे झाली आहे. 

सोलापूर शहराच्या हद्दवाढीमुळे अनेक भागांसह मजरेवाडी परिसरही महापालिका हद्दीत आला. या परिसरात शहराचा विस्तार अधिक झाला आहे. अनेक नगरांतून वसाहती तयार झाल्या. सुमारे 35 वर्षांपूर्वी ज्ञानेश्‍वर नगर परिसरात बॅंक कॉलनी ही वसाहतही झाली. सुमारे 200 कुटुंबं येथे आहेत. येथील रहिवासी कुठेही "खळ्ळखट्याक' न करता केवळ निवेदनाद्वारे विकासाची मागणी करून वाट पाहणारे असल्याने कदाचित दुर्लक्ष झाल्याची शक्‍यता आहे. महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर आपल्याला सर्व सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या मिळणार अशी अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरली. अनेक वसाहतीत "राजकीय वरदहस्त' लाभल्याने तत्परतेने सोयीसुविधा झाल्या; मात्र येथे गेल्या 30-35 वर्षांपासून नागरिक विकासाची चातकाप्रमाणे वाटच पाहात आहेत. 

आतापर्यंत अनेक नगरसेवक, आमदार झाले परंतु त्यांनी स्व-विकासाशिवाय काहीच केले नसल्याची भावना येथील नागरिकांत आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक कधीच आम्ही बघितले नसल्याचेही येथील नागरिकांनी आवर्जून सांगितले. 

रहिवासी म्हणतात... 
रुद्रय्या हिरेमठ म्हणतात, गेल्या 35 वर्षांपासून येथे राहात आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यावर सुविधा मिळतील असे वाटले मात्र काहीच नाही. साधा रस्ताही नाही. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाइपलाइन नाही. महापालिकेने किमान आम्ही भरलेल्या टॅक्‍सच्या रकमेचा वापर तरी येथील विकासासाठी करावा. 

रोहन पाटील म्हणतात, गेल्या 29 वर्षांपासून येथे घर आहे. प्रभागातील तीन नगरसेवकांपैकी एकच नगरसेवक येतात. बाकीचे दोन नगरसेवक कधीच येत नाहीत. त्यामुळे विकासाची अपेक्षा कोणाकडून करायची? ज्यांना निवडून दिले तेच फिरकत नसल्याने अधिकारीही दुर्लक्ष करतात. परंतु टॅक्‍स वसूल करतात त्यानुसार सुविधाही द्याव्यात, असे महापालिकेला वाटत नाही, हे दुर्दैवच आहे. 

नागेश फुटाणे म्हणतात, 15 वर्षापासून येथे राहात आहे. रस्ता नसल्याने पावसाळ्यात चिखल होतो. महापालिकेचे लक्ष नाही. घरासमोर पाणी साचून चिखल होत असल्याने स्वखर्चानेच मुरूम टाकला. दिवाबत्ती, पिण्याचे पाणी व रस्ते या मूलभूत सुविधाही महापालिकेकडून मिळत नसल्याने टॅक्‍स का भरायचा, असे वाटते. 

प्रदीप काळे म्हणतात, मजरेवाडी ग्रामपंचायत असताना 35 वर्षांपूर्वी घर बांधले. प्राथमिक गरजाही महापालिकेकडून पूर्ण झाल्या नाहीत. पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र पाइपलाइन, स्वतंत्र रस्ता, पथदिवे, ड्रेनेज याचीही सोय नाही. तत्कालीन अधिकाऱ्यांनी आमच्या कॉलनीसाठी एका खासगी प्लॉटमधून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन माझ्या बंगल्यातून नेली आहे. याबाबत अनेक वेळा सांगितले तरी कोणीच लक्ष देत नाही. 

सुनंदा देव म्हणतात, पक्के रस्ते तयार करण्याची गरज आहे. पावसामुळे रस्ते चिखलमय होऊन चालणेही मुश्‍कील होते. महिलांना रात्रीच्या वेळी फिरणे असुरक्षित आहे. महापालिकेने स्ट्रीट लाईटसह रस्ते, ड्रेनेज व पाण्याची पाइपलाइन द्यावी. 

सुजाता मुडके म्हणतात, गेल्या अनेक वर्षांपासून सोयीसुविधांची वाट पाहूनही महापालिकेकडून घोर निराशा होत आहे. प्रत्येक निवडणुकीवेळी आश्‍वासने दिली जातात, मात्र पुन्हा कोणीच फिरकत नाही. 

भाग्यश्री कुलकर्णी म्हणतात, या वसाहतीनंतर तयार झालेल्या वसाहतीमध्ये सुविधा झाल्या मात्र येथे सुविधा झाल्या नाहीत. नेमके कारण समजत नाही. आम्ही ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. खड्डे अन्‌ चिखलामुळे दुरवस्था झाली आहे. ड्रेनेजलाइनचे कामही अर्धवटच पडले आहे. 

लता कांबळे म्हणतात, या परिसरात वसाहतींची संख्या वाढत असून सर्वात जुन्या वसाहतींकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे. येथे कोणतीच सुविधा नसल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. 

उमेश चांडोले म्हणतात, लोकभावना लक्षात घेऊन नगरसवेक व अधिकाऱ्यांनी सुविधा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. या वसाहतीकडे कायम दुर्लक्ष होत आले आहे. प्राथमिक सुविधाही मिळाल्या नसल्याने आम्ही त्रासून गेलो आहोत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com