जड वाहनांना निर्बंधाचा साखळदंड! जाणून घ्या पोलिसांची नियमावली, जड वाहतुकीचे थांबणार बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cp rajendra mane
जड वाहनांना निर्बंधाचा साखळदंड! जाणून घ्या पोलिसांची नियमावली, जड वाहतुकीचे थांबणार बळी

जड वाहनांना निर्बंधाचा साखळदंड! जाणून घ्या पोलिसांची नियमावली, जड वाहतुकीचे थांबणार बळी

सोलापूर : शहरातून ये-जा करणाऱ्या जड वाहनांवर आता पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या निर्णयानुसार सोलापूर शहरात सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जड वाहतूक पूर्णपणे बंद राहील. जुना पूना नाका ते निराळे वस्ती येथून जाणारी जड वाहतूक आता कायमस्वरूपी बंद राहील. जड वाहनांचा वेग ताशी २० किमीच असावा, उसाच्या ट्रॅक्टरला एकच ट्रॉली असेल, असे निकष ठरवून दिले आहेत.

शहरातील जड वाहतूक अनेकांच्या जिवावर बेतली असून चार दिवसांत दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली. तर काहींनी महापालिका, पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ पालकमंत्र्यांच्या दारात नगरला जाऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.

त्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवारी (ता. ३०) पहिली बैठक घेतली. त्यानंतर जड वाहतुकीसंदर्भात रातोरात नवी नियमावली तयार करून मंगळवारी (ता. ३१) महापालिका, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पोलिस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, राज सलगर, आतिश बनसोडे, सोहन लोंढे, जुबेर बागवान, सुहास कदम, शाम कदम, सोमनाथ राऊत, शोएब चौधरी, शरद गुमटे, अक्षय अंजिखाने, सुरज पाटील, बाबा निशाणदार, अरविंद शेळके, तेजस गायकवाड यांच्यासह सोलापूर विकास संघर्ष समितीचे निमंत्रक उपस्थित होते.

आजपासून नवे नियम लागू

  • सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत जड वाहतूक पूर्णत: बंद; रात्री नऊ ते सकाळी सातपर्यंत परवानगी

  • जुना पूना नाका ते निराळे वस्ती येथून जड वाहतूक कायमस्वरूपी बंद

  • जुना पूना नाका येथे महापालिका, पोलिस व आरटीओ प्रशासनातर्फे ‘हाईट ब्रेकर’ बसवण्यात येणार

  • सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत जुना पूना नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हाया अण्णाभाऊ साठे चौक येथील जड वाहतूक बंद

  • शहरातील दुकानांमध्ये माल उतरविण्यासाठी येणाऱ्या माल वाहनांसाठी दुपारी एक ते चारपर्यंत मुभा

  • जड वाहने शहरातून ये-जा करताना त्या वाहनांचा वेग ताशी २० किलोमीटर एवढाच असणे बंधनकारक

  • शहरातील १९ सिग्नलपैकी ७ सिग्नल चालू असून बंद असलेले सिग्नल तत्काळ चालू करण्याचे आदेश

उसाच्या ट्रॅक्टरला आता एकच ट्रॉली

शहर हद्दीतून साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला मागे केवळ एकच ट्रॉली राहील. त्यासंबंधीच्या सूचना साखर कारखान्यांना दिल्या जाणार आहेत. अपघात होऊ नयेत, वाहतूक कोंडी होणार नाही, यादृष्टीने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत तसा निर्णय झाला. उद्यापासून (१ फेब्रुवारी) हे नवे आदेश लागू केले जाणार आहेत.