esakal | विनामास्क नागरिक नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घाबरत नाहीत, सोबतीला पोलिस द्या ! मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Bharane_Meeting

नगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी हजर असतात; परंतु नागरिक त्यांना घाबरत नसल्यामुळे त्यांच्या सोबतीला पोलिसांची नियुक्ती करावी. त्यामुळे बिगर मास्क नागरिकांवर कारवाई करणे अधिक सोयीचे होणार आहे, अशी मागणी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. 

विनामास्क नागरिक नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना घाबरत नाहीत, सोबतीला पोलिस द्या ! मंगळवेढ्याच्या नगराध्यक्षांची पालकमंत्र्यांकडे मागणी 

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा (सोलापूर) : नगरपालिकेचे कर्मचारी विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यासाठी हजर असतात; परंतु नागरिक त्यांना घाबरत नसल्यामुळे त्यांच्या सोबतीला पोलिसांची नियुक्ती करावी. त्यामुळे बिगर मास्क नागरिकांवर कारवाई करणे अधिक सोयीचे होणार आहे, अशी मागणी नगराध्यक्षा अरुणा माळी यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. त्यावर पालकमंत्र्यांनी, पोलिस बंदोबस्त देऊन कारवाई आणखी कडक करण्याची सूचना पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांना केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, नगराध्यक्षा अरुणा माळी, सभापती प्रेरणा मासाळ, जि. प. सदस्य नितीन नकाते, उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, महावितरणचे उपअभियंता संजय शिंदे, दिवंगत आमदार भारत भालके यांचे स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. 

कोरोनाच्या संकटामध्ये शेजारच्या तालुक्‍याचा विचार करता, मंगळवेढ्यामध्ये मास्क नसलेल्यांची संख्या जास्त दिसून आल्यामुळे मास्क नसणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या. 

या वेळी पालकमंत्री म्हणाले, आजच्या दौऱ्यात मला या ठिकाणी नागरिकांची असलेली संख्या जास्त आढळून आली. त्यामुळे पोलिसांना आतापर्यंत किती जणांवर कारवाई केली, असे विचारण्यात आले असता पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी 193 नागरिकांवर कारवाई करत 71 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगितले. ही कारवाई आणखीन कडक करण्याच्या व शाळा बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. 

कोव्हिड परिस्थितीचा आढावा उपविभागीय अधिकारी उदय भोसले यांनी सादर करत, यापूर्वी कोव्हिड रुग्णालय नसल्यामुळे इतर ठिकाणी जावे लागत होते, परंतु मंगळवेढ्यात कोव्हिड रुग्णालयाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले. 

वैद्यकीय अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे यांनी तालुक्‍यामधील वैद्यकीय परिस्थितीचा आढावा सादर केला. इतर तालुक्‍यांचा विचार करता परिस्थिती नियंत्रणात असून दररोज चाचण्या सुरू असल्याचे सांगितले. 

विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरत भालके यांनी कोव्हिड सेंटरमधील अस्वच्छता व शवविच्छेदन करताना ग्रामीण भागातील मृतदेहांची अडवणूक केली जाते, त्या वेळी शहर व ग्रामीण असा भेदभाव न करता ज्या ठिकाणी मृतदेह आहे त्या ठिकाणी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन करावे, अशी मागणी केली. 

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कौडूभैरी म्हणाले की मास्क नसलेल्या नागरिकावर केलेल्या कारवाईतील दंडाची रक्कम नागरिकाच्या मास्कसाठी वापरण्यात यावी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजमील काझी यांनी शहरांमध्ये जड वाहतूक न होण्याच्या दृष्टीने उपाय योजना कराव्यात. स्वाभिमानीचे शहराध्यक्ष हर्षद डोरले यांनी कोरोना काळातील व्यापारी गाळ्याचे भाडे व वीज बिल माफ करण्याची मागणी केली. 

तालुक्‍यातील आरोग्य खात्यात असणारी रिक्त पदे, नव्याने मंजूर झालेली नऊ उपकेंद्र व प्रस्तावित नऊ उपकेंद्रे यावर या बैठकीत चर्चा झाली नसल्यामुळे कोरोनाच्या संकटामध्ये आरोग्य व्यवस्था सक्षम कशी होणार, असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

loading image