शहरातील १४ हजार रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई! ‘हे’ आहे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rickshaw
शहरातील १४ हजार रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई! ‘हे’ आहे कारण

शहरातील १४ हजार रिक्षांवर उद्यापासून ‘आरटीओ’ची कारवाई! ‘हे’ आहे कारण

सोलापूर : शहरातील रस्त्यांवर तब्बल १६ हजार रिक्षा चालतात. दहा वर्षांनी रिक्षाचे भाडे वाढले आणि १८ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. परंतु, रिक्षा चालकांनी ९० दिवसांत मीटर प्रमाणीकरण करून घेण्याचे बंधन होते. आता १०० दिवस होऊनही केवळ सतराशे रिक्षांनीच मीटर प्रमाणीकरण करून घेतले आहे. त्यामुळे आता उद्यापासून (मंगळवार) मीटर प्रमाणीकरण न करता ज्यादा भाडे घेणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली जाणार आहे.

ऑटोरिक्षांच्या भाडेवाढीचा निर्णय २०१२-१ मध्ये झाला होता. त्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या प्रयत्नातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रिक्षाची भाडेवाढ करण्यास मान्यता दिली. कोरोना काळात अडचणीचा सामरा त्यांना करावा लागला होता. इंधन दरवाढीमुळे त्यांना जुने भाडे परवडत नाही म्हणून १५ जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी २३ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक एक किलोमीटरसाठी प्रवाशांना १५ रुपये मोजावे लागत आहेत. महापालिका क्षेत्रातील रिक्षांसाठी रात्री १२ ते सकाळी ५ यावेळेत २५ टक्के अतिरिक्त भाडे आकारणीस परवानगी देण्यात आली आहे. तसेच महापालिका क्षेत्र वगळून इतर ग्रामीण भागातील रिक्षांना रात्री १२ ते सकाळी ५ पर्यंत ४० टक्के भाडे आकारणीस मान्यता आहे. रिक्षातील प्रवाशांसोबत आणलेल्या मोठ्या आकाराच्या साहित्याला पाच रुपयांचे भाडे घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. पण, मुदतीत मीटर प्रमाणीकरण न करणाऱ्या रिक्षांना ही भाडेवाढ लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. आता त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

अशी झालीय भाडेवाढ

  • दीड किलोमीटर : २३ रुपये

  • तीन किलोमीटर : ४६ रुपये

  • साडेचार किलोमीटर : ६८ रुपये

  • सहा किलोमीटर : ९१ रुपये

  • आठ किलोमीटर : १२१

  • दहा किलोमीटर : १५१ रुपये

४० दिवसांसाठी परवाना निलंबीत होणार

ऑटोरिक्षांमधील मीटरचे कॅलिब्रेशन (प्रमाणीकरण) ३१ ऑक्टोबरपर्यंत करून घेणे अपेक्षित आहे. मुदतीत मीटर प्रमाणीकरण न केल्यास प्रत्येक दिवसाच्या विलंबासाठी संबंधित रिक्षाचा परवाना एक दिवसांसाठी निलंबित केला जाणार आहे. मीटर कॅलिब्रेशनसाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली होती. पण, मुदतीत कॅलिब्रेशन करून न घेतल्याने आता जास्तीत जास्त ४० दिवसांसाठी त्या रिक्षाचा परवाना निलंबीत केला जाणार आहे.

...तर भाडेवाढ करता येणार नाही

दहा वर्षांनी रिक्षांची भाडेवाढ झाली, पण सर्व रिक्षांमधील मीटर प्रमाणीकरण ९० दिवसांत करून घेणे अपेक्षित होते. मुदतीनंतर पुन्हा काही दिवसांची मुदतवाढ दिली. तरीपण, बहुतेक रिक्षांनी मीटर प्रमाणीकरण करून घेतले नसल्याने १ नोव्हेंबरपासून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर