Ukraine Crisis: सोलापूर जिल्ह्यातील 16 विद्यार्थी सुखरूप दिल्लीला पोहचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Students

Ukraine Crisis: सोलापूर जिल्ह्यातील 16 विद्यार्थी सुखरूप दिल्लीला पोहचले

करकंब : युक्रेन देशातील डेनिप्रो येथे वैद्यकीय शिक्षण घेणारे 16 विद्यार्थी आज (शनिवार) पहाटे दिल्ली येथे सुखरुप पोहचले आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था महाराष्ट्र शासनाने तेथील महाराष्ट्र सदन मध्ये केली आहे.

युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर सहा-सात दिवस भारतीय विद्यार्थ्यांनी युद्धाच्या खाईत अत्यंत तणावात काढले. कुटुंबियांसह आप्त नातेवाईकांच्याही काळजाचा ठोका चुकविणाऱ्या परिस्थितीतुन बाहेर येत ह्या सर्व विद्यार्थ्यांनी मागील तीन दिवसांपासून रोमोनिया देशात आश्रय घेतला होता. तेथील शासन आणि पोलिसांनी राहण्याची व जेवणाची अत्यंत उत्तम व्यवस्था केली होती. काल (शुक्रवार) रात्री भारत सरकारने विशेष विमानाची व्यवस्था करून सर्व विद्यार्थ्यांना भारतात आणले आहे. आज (शनिवार) पहाटे दिल्लीत पोहचल्या नंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची व्यवस्था महाराष्ट्र सदन मध्ये करण्यात आली आहे.

हेही वाचा: राष्ट्रवादी कॉंग्रेस हा गांधी-नेहरूंची विचारधारा मानणारा पक्ष : पवार

सर्वांची नावनोंदणी करण्यात आली असून विमानाची व्यवस्था होताच त्यांना मोबाईलवर संदेश पाठवून कळविले जाणार आहे. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्यांना मुंबई अथवा पुणे येथे शासन खास विमानाद्वारे सोडणार आहे. मागील दहा-बारा दिवस अत्यंत तणावात काढल्यानंतर आता सर्वजण सुखरूप मायदेशी पोहचल्यानंतर सर्वांना घराची ओढ लागली असून कुटुंबियांसह आप्तेष्ट आणि मित्रांना भेटण्याची आतुरता लागून राहिली आहे.

आज दिल्लीत सुखरूप पोहचलेले सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी

विश्वास बोंगे, वैष्णव कोळी, अभिजित चव्हाण, निरंजन कळभरमे, प्रथमेश माने, गायत्री पोरे (पुणे), सचिन कारंडे, शिवम सावंत, आकाश पवार, प्राजक्ता भोसले, संस्कृती माने, प्रथमेश कांबळे, रितेश गवळी, श्रेयश सावळे, किंजल कांबळे, प्रबोधिनी कदम.

प्रतिक्रिया

विश्वास बोंगे ( तपकिरी शेटफळ, ता.पंढरपूर) - आम्ही सोलापूर जिल्ह्यातील सोळा जण आज शनिवारी पहाटे दिल्ली येथे पोहचलो असून येथील महाराष्ट्र सदनात शासनाने आमची खूप छान व्यवस्था केली आहे. इथून पुढेही आम्हाला घरी जाण्यासाठी मुंबई किंवा पुणे येथे जाण्यासाठी शासनाकडूनच विमानाची व्यवस्था केली जाणार आहे. आम्हाला महाराष्ट्र सदन मधून बाहेर कोठेही जाण्याची परवानगी नाही. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीतून आम्हाला भारतात आणण्यासाठी आणि घरी पोहचविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत. मरणाच्या दाढेतून बाहेर आल्यानंतर आता कुटुंबियांना भेटण्याची ओढ लागली आहे.

टॅग्स :Solapurstudentdelhi