esakal | सांगोला शहरातील पात्र दिव्यांगांना चार लाखांचे विमा कवच !
sakal

बोलून बातमी शोधा

सांगोला शहरातील पात्र दिव्यांगांना चार लाखांचे विमा कवच !

नगरपरिषदेमार्फत दिव्यांगांचा चार लाखांचा विमा उतरविला गेला आहे.

सांगोला शहरातील पात्र दिव्यांगांना चार लाखांचे विमा कवच !

sakal_logo
By
दत्तात्रय खंडागळे

सांगोला (सोलापूर) : नगरपरिषद शहरातील दिव्यांग बांधवांसाठी सतत प्रयत्नशील असते. आजवर पात्र दिव्यांग लाभार्त्यांच्या थेट बॅंक खात्यावर आर्थिक मदत पाठविणे, विविध उपयोगी साहित्य पुरविणे अशा प्रकारे केल्या जात असलेल्या मदतीच्या एक पाऊल पुढे जाऊन सांगोला नगरपरिषदेमार्फत (Sangola, District Solapur) दिव्यांगांचा चार लाखांचा विमा उतरविला गेला आहे. सांगोला नगरपरिषदेमार्फत नगरपरिषद हद्दीतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी "प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना' (Pradhan Mantri Jeevan Jyoti Vima Yojana) व "प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना' (Pradhan Mantri Suraksha Vima Yojana) या केंद्र सरकार पुरस्कृत योजना सुरू करून या योजनांच्या वार्षिक प्रीमियमची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे (Kailas Kendre) यांनी दिली.

हेही वाचा: अंतिम वर्षासाठी विद्यार्थ्यांना 'कौशल्य' कोर्स बंधनकारक !

आजच्या घडीला प्रत्येकाचा विमा असणं व गुंतवणूक करणं आवश्‍यक झालं आहे. विमा उतरविल्याने कुटुंबातील इतर सदस्यांना अडचणीच्या काळात आर्थिक आधार मिळतो. कोरोनासारख्या जीवघेण्या काळात तर आपली सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने दिव्यांगांना आर्थिक मदत करण्यापलीकडे जाऊन त्यांना शासकीय विमा योजनांचा लाभ मिळवून देण्याचा मोठा निर्णय सांगोला नगरपरिषदेने घेतला. अशा प्रकारे दिव्यांग बांधवांना विमा कवच लागू करणारी सांगोला नगरपरिषद ही कदाचित पहिलीच नगरपरिषद आहे.

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

  • लाभार्थी : 18 ते 50 वर्षे वयोगटातील जीवन विमा न नोंदवलेले सर्व नागरिक

  • वार्षिक प्रिमियम : 330 रुपये + सेवाकर

  • लाभ : कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसाला दोन लाख रुपयांची रक्कम मिळते.

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

  • लाभार्थी : 18 ते 70 वर्षे वयोगटातील अपघात विमा न नोंदवलेले सर्व नागरिक

  • वार्षिक प्रिमियम : 12 रुपये + सेवाकर

  • लाभ : अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नामनिर्देशित वारसाला दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य, विमाधारकाला पूर्ण अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये तसेच आंशिक अपंगत्व आल्यास एक लाख रुपये आर्थिक साहाय्य.

हेही वाचा: आठवणी आबासाहेबांच्या! लाकडी टेबल-खुर्ची, फरशीवर अंथरलेली ती सतरंजी

या दोन योजनांचे फायदे लक्षात घेता सांगोला नगरपरिषद हद्दीतील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या 54 पात्र लाभार्त्यांच्या, तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या 74 पात्र लाभार्त्यांच्या खात्यांवर प्रीमियमची रक्कम जमा करण्यात आली आहे. या योजनांचा विमा कालावधी 1 जून - 31 मे असा असल्याने दरवर्षी 31 मेच्या आधी ही वार्षिक हप्त्याची रक्कम नगरपरिषदेमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच बॅंक खाते बंद असल्यामुळे किंवा प्रीमियम कट होण्याच्या वेळी खात्यांत बॅंकांची कमीत कमी शिल्लक नसल्यास विमा रद्द केला जाऊ शकतो, म्हणून या दोन्ही योजना यशस्वी होण्यासाठी आपली बॅंक खाती चालू ठेवण्याचे व खात्यामध्ये बॅंकेच्या नियमानुसारची कमीत कमी शिल्लक ठेवण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सर्व पात्र दिव्यांग बांधवांना केले.

एकही लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये व योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करणे, आवश्‍यक फॉर्म भरून घेणे, बॅंकांशी संपर्क साधून इतर पूर्तता करून घेण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक तृप्ती रसाळ, सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक स्वप्नील हाके, योगेश गंगाधरे, लेखापाल जितेंद्र गायकवाड, लेखापरीक्षक विजय कन्हेरे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच प्रहार संघटनेचे समन्वयक नावेद पठाण यांनी याबाबत विशेष पाठपुरावा केला.

शहरातील दिव्यांगांना विविध स्वरूपात साहाय्य करण्यासाठी सांगोला नगरपरिषद कटिबद्ध आहे. पात्र लाभार्थ्यांनी त्यांच्या या विमा योजना सुरू झाल्याबाबत आपले खाते ज्या बॅंकेत आहे त्या बॅंकेशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी व आपल्या घरच्यांना याबाबत माहिती द्यावी.

- राणी माने, नगराध्यक्षा, सांगोला नगरपरिषद

नेहमीच्या आर्थिक साहाय्याच्या स्वरूपातील मदतीबरोबरच शहरातील पात्र दिव्यांग बांधवांना विमा कवच देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व यामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबास अडचणीच्या काळात मोठा आर्थिक आधार उपलब्ध होईल असा विश्वास वाटतो.

- कैलास केंद्रे, मुख्याधिकारी, सांगोला नगरपरिषद

loading image
go to top