esakal | शाळा सुरू होणार, पण विद्यार्थ्यांचे लसीकरण केव्हा? पालकांमध्ये चिंता
sakal

बोलून बातमी शोधा

School

शाळा सुरू होणार पण विद्यार्थ्यांचे लसीकरण केव्हा? पालकांमध्ये चिंता

sakal_logo
By
राजाराम माने : सकाळ वृत्तसेवा

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू झाले असले तरी, विद्यार्थ्यांचे लसीकरण केव्हा होणार, विद्यार्थ्यांना लस मिळणार का, हा प्रश्‍न पालकांसह विद्यार्थ्यांना सतावत आहे.

केत्तूर (सोलापूर) : कोरोनाच्या (Covid-19) संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संसर्गाच्या भीतीच्या वातावरणातच यंदाचे 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी, ऑनलाइन शिक्षण (Online Education) सुरू झाले आहे. तसेच सोमवारपासून जिल्ह्यातील काही शाळांमधील आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न निमार्ण झाला आहे. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण (Vaccination) सुरू झाले असले तरी, लसीकरणात मोठ्या प्रमाणावर सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटाला लसीकरण मिळणे महाकठीण झाले आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे लसीकरण केव्हा होणार, विद्यार्थ्यांना लस मिळणार का, हा प्रश्‍न पालकांसह विद्यार्थ्यांना सतावत आहे. (Schools are starting but parents are worried about students being no vaccination)

हेही वाचा: "दहिगाव'च्या 342.30 कोटींच्या प्रस्तावास मान्यता !

प्रत्यक्षात शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी, शिक्षक, मित्र कंपनी यांचा प्रत्यक्ष संपर्क होत नसल्याने विद्यार्थ्यांची मानसिकता बदलू लागली आहे. हे ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांच्या पचनी पडणे अवघड होत असल्याने त्यांची चिडचिड वाढली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्‍यता गृहीत धरून शासन खबरदारी घेत आहे. परंतु, विद्यार्थ्यांना लस केव्हा मिळणार, हा प्रश्न पालकांना आहेच. त्यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होणे महत्त्वाचे व गरजेचे आहे. कोरोनामुळे एकूणच शैक्षणिक वातावरण दूषित झाले आहे. त्यातच गुणवत्तेचा प्रश्न आ वासून उभा आहे.

हेही वाचा: "ऑनलाइन' तहकूब, "ऑफलाइन'चा प्रस्ताव ! झेडपी शोधतेय मोठे सभागृह

ग्रामीण भागातील शिक्षणाचा खेळखंडोबा

ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा पुरता खेळखंडोबा झाला आहे, तर दहावी व बारावी या महत्त्वाच्या वर्षातील मुलांच्या भवितव्याची पालकांना चिंता लागली आहे. यापुढे शाळा सुरू झाल्या नाहीत तर विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याचा धोका वाढू लागला आहे, तर शाळा बंद असल्याने लहान वर्गातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाचन, लिखाण याला ब्रेक बसला आहे. आता शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण गरजेचे असल्याचे मत शिक्षक, विद्यार्थी व पालक व्यक्त करत आहेत.

ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा लक्षात घेऊन मागील वर्षी झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सेतू अभ्यासक्रम उपक्रम शासनाने सुरू केला आहे. याशिवाय गावोगावी जिथे शक्‍य आहे, तिथे झाडाखालील शाळा सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू करण्यासाठी शासनाचे जसे निर्देश येतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल.

- अनिल बदे, शिक्षण विस्तार अधिकारी, करमाळा

ऑनलाइन शिक्षण म्हणावे तितके प्रभावी ठरत नाही. तसेच याचा मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहे. ज्या गावात शक्‍य आहे तिथे शाळा सुरू कराव्यात; मात्र विद्यार्थ्यांचे लसीकरणही त्वरित सुरू करणे आवश्‍यक आहे.

- सुधाकर पाटील, पालक

loading image