
विज्ञान शिक्षकांना तीन वर्षात करावी लागणार ‘बीएससी’
सोलापूर : जिल्ह्यातील झेडपी शाळांना पूर्णवेळ पदवी-पदवीधर विज्ञान शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. विज्ञान विषयातून बारावी उत्तीर्ण शिक्षकांकडून समाजाशास्त्राचा नकार घेऊन त्यांना विज्ञान शिक्षक म्हणून बढती दिली जाणार आहे. पण, बीएससीची पदवी घेईपर्यंत त्यांना पदस्थापना व वरिष्ठ वेतनश्रेणी मिळणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली.
जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७९८ शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गावरील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित विषयाचे स्वतंत्र शिक्षक असणे अपेक्षित आहेत. पदवी तथा पदवीधर शिक्षण घेतलेल्यांना वेतनश्रेणीचा लाभ देऊन त्यांना विषय शिक्षक म्हणून पदोन्नती दिली जाते. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पदवी-पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले शिक्षक कमी असल्याने १२ वी विज्ञान झालेल्यांना तो विषय शिकवण्याची जबाबदारी देण्यासंदर्भात शासनाने आदेश काढले. त्यानुसार कार्यवाही होणे अपेक्षित होते, पण पुढील तांत्रिक अडचणींमुळे हा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही. आता प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी ते काम हाती घेतले आहे. ३ मेनंतर ही प्रक्रिया सुरु होईल. तालुकास्तरावर संबंधित शिक्षकांना शाळांची नावे सांगितली जातील. त्यांच्या सोयीनुसार त्यांना शाळा निवडता येणार आहे. मात्र, संबंधित शिक्षकाला बीएससी पूर्ण केल्याशिवाय त्या पदावर पदस्थापना मिळणार नाही. समाजशास्त्राचा नकारा कळवून विज्ञान विषय निवडणाऱ्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदल्यांशिवाय अन्य कोणताही लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे. सोलापूर झेडपी शाळांमधील ५२ शिक्षकांचे विज्ञानातून पदवी-पदव्युत्तरचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ३५२ शिक्षकांपैकी केवळ २२ ते २७ शिक्षकांनाच विज्ञान शिक्षक म्हणून स्वतंत्र कार्यभार दिला असून उर्वरित जागांवर बारावी विज्ञान झालेले शिक्षकच तो विषय शिकवित आहेत.
पाच वर्षांत घ्यावी लागणार पदवी
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार बारावी विज्ञान झालेल्या शिक्षकांना विज्ञान विषयाचा पूर्णवेळ शिक्षक म्हणून नेमता येते. पण, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून त्या शिक्षकाने पहिल्या तीन वर्षांतच पदवी प्राप्त करणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास संबंधित शिक्षकाला दोन वर्षांची वाढीव मुदत दिली जाणार आहे. पाच वर्षांत पदवी न घेतलेल्यांना पुन्हा मूळपदावर येऊन काम करावे लागेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन शिक्षक भरती करताना विषय शिक्षकांच्या जागा गुंतून पडणार नाहीत, याची दक्षता अधिकारी घेत आहेत. त्यांना फक्त सोयीच्या ठिकाणी बदली मिळेल, पण ना पदस्थापना ना वरिष्ठ वेतनश्रेणी.