बालकांवरील लैंगिक अत्याचार थांबायला हवेत ना? मग हे नक्की वाचा...

बालकांवरील लैंगिक अत्याचार थांबायला हवेत ना? मग हे नक्की वाचा...

सोलापूर : बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीला सुरवात झाल्यापासून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या घटनांत पोलिसांकडून संवेदनशीलपणे चौकशी केली जात आहे. कायद्यानुसार पीडित मुलाची किंवा मुलीची माहिती, ओळख गुप्त ठेवली जात आहे. न्यायालयातही अशी प्रकारचे खटले जलदगतीने चालवले जात आहेत. संशयित आरोपी गुन्ह्यातून सुटणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाते. तर अशा घटना घडूच नयेत यासाठी शाळा, महाविद्यालयांत सामाजिक कार्यकर्त्यांकडून, पोलिसांकडून प्रबोधन केले जात आहे. समाजातील सर्वच घटकांनी दक्ष राहिल्यास बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रण येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सहायक पोलिस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, सहायक सरकारी वकील शीतल डोके, सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा बालगृह तपासणी समितीचे सदस्य समीर सय्यद यांनी कॉफी विथ सकाळ उपक्रमात माहिती दिली. 

पोक्‍सोमुळे निर्माण झाला नागरिकांमध्ये विश्‍वास
बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ कारवाईला सुरवात केली जाते. अशा प्रकारच्या घटना होऊच नयेत यासाठी आम्ही शाळा-कॉलेजमध्ये सातत्याने प्रबोधन करत आहोत. मुलींची छेडछाड रोखण्यासाठीही रोडरोमिओवर कारवाई केली जात आहे. बाललैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे पोक्‍सोमुळे नागरिकांमध्ये विश्‍वास निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये पीडित किंवा त्यांच्या कुटुंबीयांची नावे जाहीर केली जात नाहीत. अशी प्रकरणे आम्ही अतिशय संवेदनशीलपणे हाताळतो. विश्‍वासाची भावना निर्माण करण्यात पोलिसांना यश आले आहे. मुले-मुली आणि पालकांमध्ये असलेल्या असंवादामुळे अनेक समस्या उद्‌भवत आहेत. शेक्‍यूल नॉलेज योग्य प्रकारे मिळत नसल्याने मुले-मुली चुकीच्या पद्धतीने अशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियाच्या, इंटरनेटच्या माध्यमातून अतिशय चुकीच्या प्रकारची माहिती पसरवली जाते. पालकांनी मुलांना स्मार्टफोन अथवा इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देताना काळजी घ्यायला हवी. वयात येणाऱ्या मुला-मुलींशी संवाद साधायला हवा. घरात सातत्याने होणाऱ्या आई-वडिलांच्या भांडणाचाही मुलांच्या वागण्यावर परिणाम होतो. 
- डॉ. प्रीती टिपरे, 
सहायक पोलिस आयुक्त 

मुलांना-मुलींना द्यायला हवी गुप्तांगाची माहिती
बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने 14 नोव्हेंबर 2012 रोजी बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी केली. या कायद्यात 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा अंतर्भाव होतो. या कायद्यांतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यातील पीडित मुलाची किंवा मुलीची ओळख गुप्त ठेवण्याची तरतूद आहे. बालकांना सुरक्षित आणि संवेदनशील वातावरण देणे हे पालकांचे कर्तव्य आहे. अगदी दोन-तीन वय असल्यापासून मुलांना-मुलींना गुप्तांगाची माहिती द्यायला हवी. तसेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरकाची ओळखही त्यांना करून द्यायला हवी. मुलं जर लैंगिक अत्याचाराला बळी पडली असतील तर त्यांच्या वागण्यात फरक पडतो. त्याच्याकडे पालकांनी दुर्लक्ष करू नये. अनेकदा अत्याचार करणाऱ्यांकडून धमकी दिली जाते, त्यामुळे मुले स्वतःहून काही सांगत नाहीत. अशावेळी मुलांना न रागवता विश्‍वासात घेऊन त्यांच्याशी प्रेमाने बोलून घडलेल्या घटनेची माहिती घ्यायला हवी. मुला-मुलींना स्वातंत्र्य देताना स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरकाची जाणीव करून देणे आवश्‍यक आहे. जर तुमच्या सोबत कोणी छेडछाड किंवा लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला ठामपणे विरोध करा. आरडाओरडा करून आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलवा, असे मुलांना सांगायला हवे. 
- शीतल डोके, 
सहायक सरकारी वकील 

मुलांना गुड टच, बॅड टच याविषयी माहिती देणे गरजेचे
लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार हा अतिशय गंभीर विषय आहे. अशा गोष्टी चार भिंतीच्या आतच राहिल्या पाहिजेत, समाज काय म्हणेल? नातलग काय म्हणतील? या विचारातून अनेक पालक मुला-मुलींना पोलिसांपर्यंत नेत नाहीत. लैंगिक अत्याचार करणाऱ्यापेक्षा त्याला दडपण्याचा विचार करणारा माणूस जास्त गुन्हेगार असतो. कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार सहन करू नये. अशा घटनांना वेळीच रोखले तर पुढे होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याला आळा बसेल. पोक्‍सो कायद्याबद्दलची माहिती शिक्षक व पालकांना असायला हवी. पोक्‍सो कायद्याचे शिक्षकांना प्रशिक्षण दिले पाहिजे. पालकांनी व विशेष करून शिक्षकांनी लहान मुलांना गुड टच, बॅड टच याविषयी माहिती देणे गरजेचे आहे. म्हणजे कोणता माणूस आपल्यासोबत कसा वागतो हे लहान मुलांना समजायला लागेल. लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती आवश्‍यक आहे. समाजमनाची मानसिकता बदलली तरच असे प्रकार कमी होतील. पीडित व्यक्ती कोणत्या धर्माची, कोणत्या जातीची आहे, अत्याचार करणारा कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा आहे, हा विचार करणे घातक आहे. बालक हा बालकच असतो. तो कोणत्याही जाती, धर्माचा असो. प्रत्येक बालक जणू ईश्‍वराचे स्वरूपच असतो. बालकांचे संरक्षण करणे म्हणजे ईश्‍वराची ईबादत (भक्ती) करण्यासारखे आहे. 
- समीर सय्यद, 
सदस्य, जिल्हा बालगृह तपासणीसमिती 

मुलींसोबत मुलांवरही व्हावेत योग्य संस्कार... 
जर एखाद्या मुलासोबत किंवा मुलीसोबत अत्याचाराचा प्रसंग घडलाच तर पालक म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत आहात याची जाणीव करून द्या. मुलींवर उत्तम संस्कार करताना मुलांवर देखील योग्य संस्कार होणे तितकेच महत्त्वाचे आहे. घराबाहेरील मुलींना वाईट दृष्टीने पाहू नये. त्यांचा आदर करावा तसेच तुमच्यासमोर जर कोणी एखाद्या मुलीला त्रास देत असेल तर तिची मदत करणे हे तुमचे कर्तव्य आहे, ही भावना मुलांमध्ये रुजवायला हवी. एखाद्या मुलीवर किंवा मुलावर लैंगिक अत्याचार होत असेल तर एक नागरिक म्हणून त्याला विरोध करायला हवा आणि मदतीसाठी पुढे यायला हवे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com