शेतकऱ्यांना आता उसाचे वजन मोफत करून मिळणार, जिल्हा शिवसेना प्रमुख चवरे यांचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

शेतकऱ्यांना आता उसाचे वजन मोफत करून मिळणार, जिल्हा शिवसेना प्रमुख चवरे यांचा निर्णय

मोहोळ : सध्या संपूर्ण राज्यात साखर कारखान्यांच्या उसाच्या वजन काट्या बाबत दूषित वातावरण तयार झाले आहे. अनेक संघटना, विविध शेतकरी संघटनांनी कारखानदार उसाचा काटा मारतात असा धडधडीत आरोप केला आहे. त्यावर आंदोलनही झाली आहेत. त्यावर पर्याय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी पेनुर येथे स्वखर्चातून वजन काटा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून कुठल्याही कारखान्याला जाणाऱ्या उसाचे वजन मोफत करून देणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चवरे यांनी दिली. त्यांच्या या निर्णयाचे शेतकरी, ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी स्वागत केले आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाप्रमुख चवरे म्हणाले, मी ही शेतकरी आहे. जिल्हाप्रमुख नंतर. सध्या शेतकऱ्यांना एक टन उसापासून कारखानदारांना किती पैसे मिळतात याची माहिती झाली आहे. काटा मारण्या शिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह अन्य विविध शेतकरी संघटनांनी कारखानदारांच्या काटामारी विरोधात वेळोवेळी टिकेची झोड उडवली आहे. या सर्वांचा विचार करून मी काटा बसविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले. हा काटा पंढरपूर आळंदी या पालखी मार्गावरील पेनुर नजीक असणार आहे. त्याची 50 टन वजन क्षमता असून, त्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

कारखानदारा पुढे आता दुसरा काही पर्याय नसल्याने काटा मारणे हा एकच पर्याय आहे. ऊस तोडणी मजूर, ऊस पुरवठा करणारी वाहने व शेतकरी यांचा त्यामुळे मोठा तोटा होतो. अगोदरच उसाला दर नाही त्यात काटामारीने शेतकरी त्रस्त झाला आहे. या काटयावरून कोणत्याही कारखान्याला जाणाऱ्या उसाचे वजन मोफत करून देणार आहे, त्यामुळे शेतकरी, वाहन मालक व ऊस तोडणी मजूर यांची होणारी फसवणूक टाळणार आहे. सध्या मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्या निवडणुकीत उसाचा वजन काटा हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा सभासदासमोर मांडला जातोय. येत्या पंधरा दिवसात वजन काट्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचेही जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उसाचे मोफत वजन करून देण्याचा हा प्रयोग जिल्ह्यातील पहिलाच आहे.