स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा निर्णय : "कोरोना'मुळे बुफे पद्धतीने प्रसादवाटप

Akkalkot
Akkalkot
Updated on

अक्कलकोट (सोलापूर) : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर 31 मार्चपर्यंत दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद पूर्ण भोजन बसून देण्याऐवजी विशिष्ट अंतर ठेवून प्रवाही (बुफे) पद्धतीने भक्तांना रांगेतून पर्यावरणपूरक द्रोणातून शिरा प्रसाद दिला जाणार आहे, अशी माहिती मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

"कोरोना' टाळण्यासाठी होतेय जनजागृती
गेल्या 32 वर्षांपासून मंडळात दररोज सुमारे 15 ते 20 हजार भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. विविध उत्सवप्रसंगी ही संख्या लाखाच्या घरात जाते. हे पाहता भक्तांच्या हितासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर, धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख आणि जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन वेळा दिला जाणारा महाप्रसाद म्हणजे पूर्ण भोजन बसून देण्याऐवजी बुफे पद्धतीने सकाळी व संध्याकाळी याच पद्धतीने प्रसाद दिला जाणार आहे. परिणामी भक्तांचा एकमेकांशी मोठ्या प्रमाणात संपर्क होऊ शकणार नाही. प्रसादही मिळेल अन्‌ गर्दीही टळेल. तसेच नागरिकांनीसुद्धा कौटुंबिक आणि सार्वजनिक स्वच्छता राखावी. एकमेकांमध्ये कमीतकमी तीन फूट अंतर ठेवावी. हस्तांदोलन न करता नमस्कार करावा. साबणाने किंवा सॅनिटरायझरने हात वेळोवेळी धुवावेत. तोंडावर, डोळ्यावर, नाकावर, चेहऱ्यावर हात फिरवू नये. परस्परांमध्ये अंतर राखावे, स्पर्श टाळावा. कोरोना विषाणूबाबत स्वामीभक्तांनी न घाबरता सतर्कता बाळगावी आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, अशी विनंती अन्नछत्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
या वेळी न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍यामराव मोरे, खजिनदार लाला राठोड, विश्‍वस्त लक्ष्मण पाटील, न्यासाचे विधी सल्लागार ऍड. नितीन हबीब, ऍड. संतोष खोबरे, मानद जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर, अप्पा हंचाटे, मनोज निकम, प्रवीण देशमुख, धानप्पा उमदी, नामा भोसले, कुमार सलबत्ते, चंद्रकांत हिबारे, मनोज चुंगीकर, शहाजी यादव, प्रकाश गायकवाड, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, बाबूशा महिंद्रकर, रवींद्र काटकर आदींची उपस्थिती होती.

अन्नछत्र मंडळाने घेतलेली खबरदारी खूपच गरजेची आहे. देवस्थान परिसरात अनावश्‍यक गर्दी करू नये आणि जेवढे आवश्‍यक धार्मिक विधी आहेत ते मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत कराव्यात. भविकांनीही योग्य ती काळजी घेऊन या विषाणूचा मुकाबला करावा.
- दिलीप देशमुख,
धर्मादाय सहआयुक्त

अन्नछत्र मंडळ पूर्वखबरदारी घेत असून, भाविकांना स्वच्छतेसाठी हॅंडवॉश आणि सॅनिटरायझरची सोय केली आहे. दररोज पाच वेळा परिसर स्वच्छता केली जात आहे. भाविकांनी योग्य काळजी घेऊन परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत जनहितार्थ घेतलेल्या निर्णयासाठी मंडळास सहकार्य करावे.
- जन्मेजयराजे भोसले,
संस्थापक-अध्यक्ष, अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com