
अशी करा नोंदणी
आज विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या हस्ते या वेबसाइटचे प्रकाशन झाले. भाविकांना पंढरी प्रसाद या लिंकवर किंवा 8767413813 या व्हॉट्सऍप क्रमांकावर नोंदणी करता येणार आहे. या वेळी पवन नगरहळ्ळी, नागेश हरिदास, विशाल मोरे, कपिल देशपांडे, प्रमोद क्षीरसागर, अनिरुद्ध बडवे आदी उपस्थित होते.
श्री विठ्ठलाचा प्रसाद मिळणार घरपोच; पंढरपुरातील उद्योजकांची अनोखी संकल्पना
पंढरपूर (जि. सोलापूर) : कोरोनाच्या भीतीमुळे यंदाची आषाढी यात्रा भरणार नसल्यामुळे लाखो विठु भक्तांना यंदा पंढरपूरला येता येणार नाही. तथापि सावळ्या विठुरायाचा प्रसाद भाविकांना घरपोच मिळावा यासाठी पंढरपुरातील काही उद्योजकांनी एकत्रित येऊन ना नफा ना तोटा तत्त्वावर भाविकांना "प्रसाद रूपी पंढरीची वारी' पोचण्यासाठी अनोखी संकल्पना सुरू केली आहे. त्यामुळे यात्रेला भाविक येऊ शकणार नसले तरी विठुरायाचा प्रसाद मात्र घरपोच होण्याची व्यवस्था झाली आहे.
आषाढी यात्रेसाठी येणारे भाविक पंढरपुरात आल्यानंतर प्रासादिक वस्तूंची खरेदी करत असतात. हे लक्षात घेऊन पंढरपुरातील देशपांडे पेढेवाले, महाप्रसाद अगरबत्ती, जव्हेरी प्रासादिक वस्तू केंद्र तसेच स्वरूप माळी या लहान-मोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन कुरिअरच्या माध्यमातून होम डिलिव्हरी देण्यासाठी "पंढरी प्रसाद' ही ऑनलाइन लिंक सुरू केली आहे.
या माध्यमातून आता राज्यभरातील लोकांना व्हॉट्सऍपद्वारे आपली मागणी नोंदवता येईल आणि पुढील सात दिवसांत पंढरपूरच्या प्रासादिक वस्तूंची घरपोच डिलिव्हरी मिळवता येईल. यात पंढरपूरचे प्रसिद्ध असणारे हळदीचे कुंकू, सुवासिक बुक्का, केशरी अष्टगंध, गोपीचंद, सुवासिक ओली अगरबत्ती, ओरिजनल तुळशीची माळ, काशाचे टाळ, केशरी पेढे, चुरमुरे-बत्तासे प्रसाद तसेच श्री विठ्ठलाचे फोटो फ्रेम आणि काही पुस्तके देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ना नफा ना तोटा तत्त्वावर ही विक्री करण्यात येणार आहे.