
उजनीत ६ टीएमसी जीवंत पाणीसाठा! पाऊस लांबल्यास परिस्थिती बिकट
सोलापूर : सोलापूर, पुणे, नगरसाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणामुळे यंदाच्या उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागली नाही. उन्हाळा संपत आला, पण टंचाईच्या झळा जाणवल्या नाहीत. अजूनही धरण प्लसमध्येच असून सध्या धरणात सहा टीमएसी जिवंत साठा आहे.
हेही वाचा: गड्या आपली मराठी शाळाच बरी! झेडपी,महापालिका शाळांचा वाढली पटसंख्या
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. तरीही, पावसाळा लांबणीवर पडल्यास शेतीसाठी व शहरासाठी धरणातून आणखी एक आवर्तन सोडावे लागणार आहे. दरवर्षी कडक उन्हाळ्यात शेतीसाठी दोन आवर्तने सोडली जातात. पण, यंदा त्यात बदल करून एकच आवर्तन महिनाभर सुरू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही.
पिकांना वेळेवर व भरपूर पाणी देता आले. दरम्यान, काही दिवसांच्या अंतराने दोन आवर्तने सोडताना पाण्याचा मोठा अपव्यय होतो. अनेक ठिकाणी कॅनॉल नादुरुस्त असल्याने लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे यंदा तसा बदल करण्यात आला होता. धरणात सध्या एकूण ७० टीएमसी पाणी आहे, पण त्यात सहा टीएमसी एवढाच जिवंत साठा आहे. त्यातही १२ टीएमसीहून अधिक गाळच आहे. आजवर गरज पडल्यास अपवादात्मक परिस्थितीत धरणातून मायनस २८ टक्क्यांपर्यंत पाणी सोडले आहे. मात्र, यंदा तशी वेळ येणार नाही, असा विश्वास अधीक्षक अभियंता साळे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर लालपरी रुळावर! दीड महिन्यातच ५२१ कोटींची कमाई
‘सीना-माढा, दहिगाव’मधून पाणी सुरूच
उजनीतून सध्या सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २९६ क्युसेक, दहिगाव उपसा सिंचन योजनेतून ८८ क्युसेक, मुख्य कॅनॉलमधून तीन हजार १०० क्युसेकने पाणी सोडले जात आहे. आणखी काही दिवस ते पाणी सुरूच राहणार आहे. मागील पावसाळ्यात धरण ११० टक्के भरल्याने यंदा पाण्याची फारशी टंचाई जाणवली नाही. उन्हाळ्यात शहरासाठी दोनदा तर शेतीसाठी एकदा पाणी सोडले गेले. उन्हाळ्यापूर्वी एक आवर्तन सोडल्याने शेतीसाठी पाण्याची टंचाई भासली नाही. अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ठोस नियोजन केल्याने अजूनही धरण प्लसमध्येच आहे.
हेही वाचा: विद्यापीठाची सत्र परीक्षा ऑफलाईनच! दररोज दोन पेपर, जाणून घ्या वेळापत्रक
शहरात पाण्यासाठी वणवण
सोलापूर ते उजनी अशी ११० किलोमीटरची समांतर जलवाहिनी होणार आहे. पण, तीन वर्षे होऊनही त्याचे काम अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. आता नवा मक्तेदार नियुक्त करून ते काम पूर्ण केले जाणार आहे. उजनीतून शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जाते. पण, अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात उन्हाळा असो वा पावसाळा, पाणीपुरवठा विस्कळितच आहे.
Web Title: Six Tmc Of Living Water In Ujjain
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..