सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणाच्या कामाबाबत साशंकता! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji lake

सोलापूर : संभाजी तलाव सुशोभीकरणाच्या कामाबाबत साशंकता!

सोलापूरची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मवीर संभाजी तलाव व सिद्धेश्‍वर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतिपथावर होते. या सुशोभीकरणातून सोलापूरचा चेहरामोहरा बदलण्याची योजना होती. सिद्धेश्‍वर तलावाचा प्रश्‍न जवळपास मार्गी लागला आहे. या फुफ्फुसांना बळ मिळण्याची खरोखरच गरज असताना, संभाजी तलावाच्या कामाबाबत मात्र अजूनही साशंकताच आहे. सुशोभीकरणाचे काम सुरू होऊन एक वर्ष लोटले तरी अजूनही जलपर्णीबाबत आपण पहिल्या पायरीवरच आहोत. हा प्रश्‍नच सुटत नसल्याचे दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या तलावात सोडण्यात येणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याचा प्रश्‍न अजूनही सतावत असल्याचे दिसत आहे.

सोलापूरला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळावा यासाठी ‘सकाळ'ने सातत्याने जनजागृती केली, पाठपुरावा केला. अगदी पहिल्या टप्प्यातच स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला. देशभरात सोलापूरचे नाव पुन्हा एकदा पुढे आले. परंतु, प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे काही कामांना म्हणावी तशी गती मिळाली नव्हती. अलीकडील काळात स्मार्ट सिटी योजनेतील अनेक कामे मार्गीही लागली आहेत. समांतर जलवाहिनीचा ऐरणीवरील मुद्दाही आता निकाली निघाला आहे. स्मार्ट सिटी योजनेत नसलेले पण सोलापूरकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले संभाजी तलाव सुशोभीकरणाचे काम होणे गरजेचे आहे. यासाठी ‘सकाऴ'ने लोकजागृती, दबावगटाद्वारे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. शासनाने राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेंतर्गत धर्मवीर संभाजी तलावाच्या सुशोभीकरणासाठी बारा कोटींचा निधी मंजूर केला. यात तलाव परिसरातील स्थापत्य कामे, सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी एसटीपी प्लांट, परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम अशा विविध सात कामांचा समावेश आहे. या तलावात पूर्वी बोटिंगची सुविधा होती. परंतु अलीकडील काळात जलपर्णीमुळे व पूर्वी झालेल्या अपघातामुळे ही सुविधा बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

पूर्वी या तलावात आजूबाजूच्या २८ सोसायट्यांमधून ड्रेनेजचे पाणी मिसळत होते. थेट घाण पाणी तलावात मिसळत असल्यानेच हा तलाव दुर्गंधीयुक्त व जलपर्णीयुक्त झाला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी परिसरातील ड्रेनेजचे पाणी तलावात मिसळू नये म्हणून पूर्वी प्रयत्न झाले होते. त्यात काही अंशी यशही आले होते. पुन्हा या तलावानजीक असलेल्या ड्रेनेजच्या सिमेंट पाइपलाइन फोडून पाण्याला रस्ता करून दिल्याचे दिसत आहे. या जुन्या पाइपलाइन बदलण्याची गरज आहे. तलावातील पाण्यात ऑक्सिजन नसल्याने जलपर्णी वाढत आहेत. उन्हाळ्यात ही जलपर्णी वाढत असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मुळात ही समस्या मुळासकट दूर होण्याची गरज आहे. यासाठीच शासनाने निधी दिला आहे. ही जलपर्णी तीन महिन्यांत हटविण्याचे ठरले होते; परंतु या कामास सप्टेंबरमध्ये सुरवात झाली, त्याला आता नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. त्याची स्थिती पुन्हा ‘जैसे थे’च आहे. मग या जलपर्णी हटविण्यासाठी केलेल्या खर्चाचे काय, असा सवाल उपस्थित होतो.

दृष्टिक्षेप -

  • तलाव सुशोभीकरणासाठी - १२ कोटी

  • तलावातील गाळ काढण्यासाठी - आठ कोटी

  • जलपर्णी हटविण्यासाठी - २७ लाख

Web Title: Skepticism About Sambhaji Lake Beautification Work

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Solapurlake
go to top