शहरात 157 जण डेंग्यू पॉझिटिव्ह ! पाण्याचा साठा कारणीभूत

शहरात 157 जण डेंग्यू पॉझिटिव्ह ! पाण्याचा साठा कारणीभूत
Dengue
DengueCanva
Summary

स्वच्छ पाण्यावर वाढणारा डेंग्यू आता सोलापूर शहरात पसरू लागला आहे

सोलापूर : स्वच्छ पाण्यावर वाढणारा डेंग्यू (Dengue) आता शहरात पसरू लागला आहे. आतापर्यंत शहरातील 552 संशयितांच्या रक्‍ताचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 271 जणांचेच रिपोर्ट प्राप्त झाले असून, त्यातील तब्बल 157 जणांना डेंग्यू असल्याचे समोर आले आहे. कोरोनाला (Covid-19) आवरण्यात मग्न असलेल्या प्रशासनाची चिंता आता डेंग्यूने वाढविली आहे. (So far 157 dengue positive patients have been found in the city-ssd73)

Dengue
शहरातील निर्बंध उठवण्याचा महापालिका आयुक्‍तांचा प्रस्ताव

जुळे सोलापूर, विडी घरकुल, होटगी रोड अशा परिसरात पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होतो. दुसरीकडे कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक इलेक्‍ट्रिक मोटारी लावून पाणी साठवून ठेवतात. त्या साठवलेल्या पाण्यावर डेंग्यूचे डास वाढत असल्याची बाब निर्दशनास आली आहे. जानेवारी ते जुलैअखेर शहरातील 552 डेंग्यूसदृश्‍य व्यक्‍तींच्या रक्‍ताची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 78 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 157 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जुलै महिन्यात 329 संशयितांची चाचणी केल्यानंतर त्यामध्ये सर्वाधिक डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, खासगी लॅबमधील रिपोर्ट ग्राह्य न धरता संशयितांच्या रक्‍ताचे नमुने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाकडे (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) पाठविले जातात. 552 संशयितांपैकी 281 संशयितांचे रिपोर्ट अजूनही महापालिकेला प्राप्त झालेले नाहीत, असेही आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. दिलासादायक बाब म्हणजे, शहरातील एकही रुग्ण डेंग्यूमुळे दगावलेला नाही. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेलेही काही रुग्ण आढळले असून काहींमध्ये चिकुन गुनियाचीही लक्षणे आढळल्याची चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेने ठोस पाऊल उचलून उपाययोजना करणे अपेक्षित आहे.

Dengue
बिबट्याच्या शोधासाठी पाणवठ्यांवर कॅमेरे ! रात्रभर गस्त सुरू

विलंबाने सुरू झाला सर्व्हे

पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील घरोघरी जाऊन डेंग्यूसह अन्य आजारांचा सर्व्हे होणे अपेक्षित होते. मात्र, पावसाळा सुरू झाल्यानंतरही तो सर्व्हे विलंबाने सुरू करण्यात आला. आतापर्यंत जवळपास एक लाख 85 हजार लोकांचा (40 हजारांहून अधिक घरे) सर्व्हे पूर्ण झाला आहे. त्यातील दोन हजार 100 पेक्षाही अधिक घरातील पाणी दूषित असल्याची बाब समोर आली. संबंधित घरातील सव्वालाख कंटेनर (पाण्याचे बॅरेल) तपासल्यानंतर त्यातील पावणेतीन हजार बॅरेलमधील पाण्यावर डासांचा प्रादुर्भाव आढळून आला. तरीही, केवळ 50 ठिकाणीच गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. आता वाढणारा डेंग्यू रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काय ठोस उपाययोजना केल्या जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरातील डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये, यादृष्टीने घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे. नागरिकांना त्यासंदर्भात सूचनाही केल्या जात आहेत. आतापर्यंत शहरातील 157 जणांना डेंग्यू झाल्याचे रक्‍त तपासणीतून स्पष्ट झाले आहे.

- डॉ. अरुंधती हराळकर, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका

आरोग्य विभागाच्या सूचना

  • घरासमोर अथवा घरात साठवून ठेवलेले स्वच्छ पाणी झाकून ठेवा

  • आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस साजरा करा; सायंकाळी दरवाजे, खिडक्‍या बंद करा

  • घरासमोरील झाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका; दररोज त्या स्वच्छ करून घ्याव्यात

  • पावसाचे पाणी घरासमोर साचू नये, याची दक्षता घ्यावी; स्वच्छ पाण्यावर वाढतात डेंग्यूचे डास

  • अशक्‍तपणा, उलटी, मळमळ वाटल्यास, अंगावर पुरळ, ताप, आल्यास तत्काळ घ्यावेत उपचार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com