रेशन दुकानात मिळणार आता साबण अन्‌ चहापत्ती | Ration Shop | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

soap and tea powder
रेशन दुकानात मिळणार आता साबण अन्‌ चहापत्ती

रेशन दुकानात मिळणार आता साबण अन्‌ चहापत्ती

सोलापूर - लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत रास्तभाव/शिधावाटप दुकानांमध्ये मोजक्‍याच वस्तूंची विक्री केली जात होती. रेशन दुकानांमध्ये गहू, तांदूळ व दिवाळीसाठी डाळ व साखर उपलब्ध होत होती. या रेशन दुकानात आता खुल्या बाजारातील वस्तू विक्रीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यामध्ये आंघोळीचा व कपडे धुण्याचा साबण, हॅंडवॉश, धुण्याचा सोडा, शाम्पू, चहापत्ती व कॉफी या वस्तुंचा समावेश आहे.

यापूर्वीपासूनच काही रेशन दुकानांमध्ये चहा पावडरची अनधिकृतपणे विक्री होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. रेशनच्या धान्यासोबत, साखरेसोबत काही दुकानदारांनी चहा पावडर घेणेही बंधनकारक केल्याचे समोर आले होते. राज्य शासनानेच आता चहा पावडरसह इतर वस्तू विक्रीस परवानगी दिली आहे. ही परवानगी अस्थायी स्वरूपात देण्यात आली असून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात वेळोवेळी होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने यामध्येही बदल केला जाणार असल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: निर्यात घटल्याने केळी उत्पादकांना फटका! केळीचे भाव झाले कवडीमोल

आंघोळीचा व धुण्याचा साबण, डिटर्जंट, शाम्पू, चहापत्ती व कॉपी या वस्तूंचे दुकानापर्यंतचे वितरण व विक्री पोटी मिळणारे कमिशन याबाबत रास्त भाव दुकानदार यांनी संबंधित कंपनीच्या वितरकांची परस्पर संपर्क साधावा. हा व्यवहार संबंधित कंपनी व त्यांचे घाऊक व किरकोळ वितरक आणि रास्त भाव दुकानदार यांच्यामध्ये राहणार आहे. या व्यवहारात शासनाचा कोणताही सहभागात वा हस्तक्षेप राहणार नसल्याचेही स्पष्टीकरण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिले आहे.

loading image
go to top