esakal | Solapur : विठ्ठलवाडीत शंभर टक्के लसीकरण पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

solapur

Solapur : विठ्ठलवाडीत शंभर टक्के लसीकरण पूर्ण

sakal_logo
By
किरण चव्हाण

माढा : विठ्ठलवाडी (ता. माढा ) गावातील शंभर टक्के लोकांचे लसीकरणाचे किमान पहिला डोस पूर्ण झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी थोरात यांनी दिली. माढा तालुक्यात शनिवारी (ता.‌11) झालेल्या लसीकरणात सोळा हजार लसींपैंकी 14295 लसी नागरिकांना टोचण्यात आल्या तर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सणादिवशी काम करत रविवारी (ता. 12) उर्वरित डोस नागरिकांना टोचले.

वेगवेगळे उपक्रम राबवत तालुक्यात चर्चेत असणाऱ्या विठ्ठलवाडी गावाने शंभर टक्के लसीकरण करून आणखी एक मान पपकावला आहे. याबाबत माहिती देताना डॉ. शिवाजी थोरात म्हणाले की आम्ही प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक गाव शंभर टक्के लसीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. उपळाई बुद्रूक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या विठ्ठलवाडी गावातील आजारी असलेले रुग्ण व परगावी गेलेले काही मोजकेच लोक वगळता इतर शंभर टक्के लसीकरण झालेले आहे.

गावातील अनेकांचा दुसरा डोसही पूर्ण झाला आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये शंभर टक्के लसीकरण झालेल्या गावांमध्ये काय परिस्थिती उद्भवते याचाही अभ्यास यामुळे करता येणार आहे. आजारी व्यक्ती व बाहेरगावी असलेल्या काही मोजक्या लोकांचे लसीकरण लवकरच पूर्ण करणार असून या कामी गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांचे सहकार्य झाल्याचं डॉ. थोरात म्हणाले. ग्रामपंचायत, ग्रामस्तरीय कोरोना जनजागृती समिती, आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या कोरोना लसीकरण जनजागृतीमुळे विठ्ठलवाडी गाव सोलापूर जिल्हातील शंभर टक्के लसीकरण झालेले बहुदा पहिले गाव ठरले आहे.

यासाठी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, सभापती विक्रमसिंह शिंदे, सरपंच संगीता अनभुले उपसरपंच हनुमंत जाधव, उपळाई बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ‌. धनराज कदम, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, मोहन कदम, अनिलकुमार अनभुले, समाजकल्याण अधिकारी संतोष जाधव, डॉ. मोहन शेगर, डाॅ. माने, पोलिस पाटील बालाजी शेगर, मुख्याध्यापक अमोल चव्हाण, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे, अंकुश गवळी, भारत कदम, गोरख शेगर, सुप्रिया ताकभाते, विजय काळे, ग्रामसेविका अनिसा पठाण, अंगणवाडी सेविका वैशाली शेंडगे, वनिता सस्ते, इंदुमती कदम, आशावर्कर माधुरी गव्हाणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपळाई बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी अकबर तांबोळी, प्रशांत शिंदे, शोभा कदम, कुतुब सय्यद, किशोर गुंड, महादेव बरकडे यांच्या प्रयत्नांमुळे विठ्ठलवाडी गावात शंभर टक्के लसीकरण झाले.

हेही वाचा: राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळवलेले पंचमुखी गणेश मंडळ

सोलापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. 11) दोन लाख लशीचे डोस‌ उपलब्ध झाले होते. शनिवारी (ता.‌11) माढा तालुक्यात झालेल्या मेगा लसीकरणात सोळा हजार लसींपैकी 14295 लोकांचे लसीकर‌ण करण्यात आले. तर रविवारी (ता. 12) सणाचा दिवस असतानाही आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी उर्वरीत डोसचे लोकांना लसीकरण केले. सणासुदीचे दिवस असतानाही नागरिकांनी लसीकरणाला मोठा प्रतिसाद दिला. पंचायत समितीतील तसेच आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे व‌ नागरिकांच्या प्रतिसादामुळे मेगा लसीकरण यशस्वी झाले.

loading image
go to top