Solapur : शासनाच्या पत्रांना प्रशासनाकडून केराची टोपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Phule Jan Arogya Yojana

Solapur : शासनाच्या पत्रांना प्रशासनाकडून केराची टोपली

सोलापूर : एकत्रित आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय विमा योजनेबाबत जिल्हा प्रशासन उदासीन आहे. वारंवार शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देऊनही गेल्या दहा वर्षात शहरात १७ तर ग्रामीणमध्ये २० टक्केच काम झाले आहे. दोन महिन्यापूर्वी जिल्ह्यातील पात्र ७ लाख ७ हजार ७२७ नागरिकांना आयुष्यमान कार्ड देण्याच्या उद्दिष्टपूर्तीसंदर्भात शासनाचे नव्याने आदेश दिले आहे. उद्दिष्टपूर्तीची मुदत संपली तरी प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरवात झाली नाही. शासनाच्या योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे यातून दिसून येते.

२०१२ मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली. यामध्ये ९९६ आजारांचा समावेश करण्यात आला. दरम्यान २०१८ ही योजना प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू झाली. या दोन्ही आरोग्य योजनेचे संयुक्तिक लाभ घेण्यासाठी आयुष्यमान आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य कार्ड वाटप करण्यास सुरवात झाली. यात आणखी काही शस्त्रक्रियांचा भर घालत १ हजार २०९ आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. इतकेच नव्हे तर महात्मा फुले योजनेंतर्गत दीड लाखापर्यंतचे उपचार मोफत होते.

ही रक्कम वाढवत प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंत आरोग्य कवच देण्यात आले. आरोग्य कार्डच्या माध्यमातून जिल्ह्यात एकूण ४४ खासगी रुग्णालये आणि ७ शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार होणार आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थी: सामाजिक, आर्थिक व जातीनिहाय जनगणना २०११ नुसार जिल्ह्यात साधारण १० लाख कुटुंबे आहेत. सर्वसामान्यांचा आर्थिक आधार बनणारी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनामार्फत स्थानिक स्वराज संस्थांना वेळोवेळी आदेश देण्यात आले आहेत. कोरोनात अनेकांसाठी ही योजना जीवनदायिनी ठरली आहे.

आयुष्यमान भारत कार्ड योजना प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोचविण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून जिल्हा प्रशासनासह सर्वच स्थानिक संस्थांना पत्र देण्यात आले. काम पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली. मात्र, स्थानिक प्रशासनाने या पत्रांना केराची टोपली दाखविण्यात आली असून मुदत संपली तरी शहर व जिल्हास्तरावर प्रत्यक्षात आरोग्य विम्याच्या कामाला सुरवात झाली नाही. या योजनेचे जिल्हा सननियंत्रक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत.

आकडे बोलतात

जिल्ह्यातील एकूण लाभार्थी संख्या : १० लाख ४१ हजार १४६

महापालिका परिक्षेत्रातील कार्डधारक संख्या : ४३ हजार

ग्रामीण परिक्षेत्रातील कार्डधारकांची संख्या : २ लाख ९० हजार ४१९

जिल्ह्यातील वंचितांची संख्या : ७ लाख ७ हजार ७२७

आयुष्यमान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कार्ड वाटप करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. शहरात २ लाख ३ हजार लाभार्थ्यांची यादी मिळाली आहे. नागरिक केंद्रातील संबंधित आशा वर्करकडे यादी देऊन हे काम पूर्ण करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी ९८ वार्ड तयार करण्यात आले असून नियोजनबद्ध आराखडा आखण्यात येत आहे.

- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी