Ujani Dam : चिंता वाढली! मध्यम प्रकल्पात दीड टीएमसीच पाणी, उजनी १३ टक्क्यांवर स्थिर

जिल्ह्याची वरदायिनी उजनी अजून समाधानकारक स्थितीत नाही. तसेच जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांनी देखील तळ गाठला आहे.
Medium Water Project
Medium Water ProjectSakal

सोलापूर - जिल्ह्यात जवळपास अडीच लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड झाली आहे. २२ दिवसांपासून पाऊसच पडला नसल्याने उजनीवर अवलंबून असलेले व कोरडवाहू क्षेत्रावरील पिके माना टाकू लागली आहेत. उजनी धरण १३ टक्क्यांवर (७ टीएमसी) स्थिरावले असून जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पातही अवघे दोन टीएमसीच पाणी आहे.

पावसाळा सुरू असतानाही ऑगस्टमध्ये सरासरीच्या १५ टक्केसुद्धा पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यात ऊस वगळता तीन लाख २५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात तूर, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल व भुईमुगाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीची तयारी केली आहे, पण रोपांनाही पाण्याची ओढ बसत आहे. यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीची पाणीपातळी देखील वाढलेली नाही.

जिल्ह्याची वरदायिनी उजनी अजून समाधानकारक स्थितीत नाही. तसेच जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांनी देखील तळ गाठला आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे एकूणच आता आगामी १५ ते २० दिवसात पाऊस न पडल्यास पावसाळ्यात दुष्काळी स्थिती निर्माण होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.

तीन लाख हेक्टरवरील पिकांना पाण्याची ओढ

जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर यासह इतर तालुक्यांमध्ये यंदा तीन लाख २५ हजार १८३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र कोरडवाहू (हंगामी बागायत) आहे. जिल्ह्यात पावसाने २० ते २२ दिवसांपासून दडी मारल्याने त्या पिकांना आता पाण्याची ओढ बसत आहे. चार-पाच दिवसात पाणी न मिळाल्यास संपूर्ण खरीप वाया जाईल, अशी वस्तुस्थिती आहे.

आमदार गप्प अन्‌ प्रशासनाचा निर्णय होईना

प्रत्येक तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची चिंता पाहून खरीप पिकांना उजनीतून एक आवर्तन सोडण्याची मागणी करणे अपेक्षित आहे. पण, बहुतेक आमदारांनी अद्याप लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे तशी मागणी केलेली नाही. उजनीत सध्या उपयुक्त पाणीसाठा सात टीएमसी आहे. एका आवर्तनासाठी तेवढेच पाणी लागते. त्यामुळे आता खरीप वाचविण्यासाठी पाणी सोडण्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी गरजेची आहे.

पाच वर्षांच्या पाण्याचा पाठविला अहवाल

१५ जूनपासून पावसाळा सुरू झाला, पण जिल्ह्यात ८ जुलैपासून पाऊस सुरु झाला. गतवर्षी १३ ऑगस्टपर्यंत १०१ टक्के भरलेले धरण सध्या १३ टक्क्यांवरच आहे. १ ऑगस्ट रोजी धरण प्लसमध्ये आले. त्यानंतर आता पुन्हा मागील २० दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे.

हवामान खात्याचा अंदाजही फेल ठरला आहे. त्यामुळे आता मागील ५ वर्षांत उजनीत १५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर या काळात किती पाणी आले, याचा अहवाल लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जलसंपदा विभागाला सादर केला आहे. त्यावरून पाणी सोडण्यासंबंधीचा निर्णय होऊ शकते, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com