सोलापूर : गुणवत्तावाढ सोडाच,पुरेसे शिक्षकही नाहीत

प्राथमिक शिक्षणाचा पाया ढासळतोय; ४३ शाळांची पटसंख्या दहापेक्षाही कमी
 teacher
teachersakal

सोलापूर : कोरोनाच्या संकटामुळे पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शाळा ९ मार्च २०२० पासून बंदच होती. तब्बल २२ महिन्यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची शाळा सुरू झाली. जिल्ह्यातील तब्बल ९७ हजार ४२६ विद्यार्थ्यांकडे ॲन्ड्राइड मोबाइल नसल्याने कोरोना काळात त्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले नाही. आता त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे. पण, शिक्षकांची ७५९ पदे रिक्‍त असल्याने अडचणी येत आहेत.

जिल्ह्यातील दोन हजार ७९८ प्राथमिक शाळांमध्ये दोन लाख एक हजार विद्यार्थी आहेत. मात्र, त्यातील ४३ शाळांमध्ये दहासुध्दा विद्यार्थी नाहीत. त्या शाळांचे भवितव्य आता अंधारात आहे. कोरोना काळात अनेक कुटुंबियांनी रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले असून हातावरील पोट असलेल्या कुटुंबातील मुले शाळेत जाण्यापेक्षा रोजगारावर गेल्याचे चित्र आहे. शाळेत न येणाऱ्या मुलांची माहिती संकलित करून शाळेत न येण्याची कारणे शोधण्याची गरज आहे. अन्यथा, ती मुले शाळाबाह्य होण्याची भीती वर्तविली जात आहे. विशेष बाब म्हणजे पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांची गुणवत्ता घसरली असून त्यांना वाचन, लेखन जमत नसल्याची वस्तूस्थिती आहे. लहान मुलांच्या शिक्षणाचा पाया भक्‍कम व्हावा म्हणून त्यांची गुणवत्ता इतर मुलांप्रमाणेच वाढावी म्हणून तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने प्रशासनाला निश्‍चितपणे विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. दुसरीकडे जवळपास ३८३ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसह शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्‍त आहेत. ज्या शाळांची पटसंख्या अधिक आहे, त्याठिकाणी कमी शिक्षक आहेत. त्याकडेही प्रशासनाला लक्ष द्यावे लागणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या माध्यमातून शिक्षक संघटनांची पुढील आठवड्यात बैठक घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांची लेखन, वाचनात प्रगती व्हावी म्हणून मे महिन्यात दोन तास घेता येतील का, याचा निर्णय घेतला जाईल. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी तसा प्रयत्न केला जाईल.

किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

४३ शाळांना लागणार टाळे?

काही शाळांमध्ये पूर्वीसारखे गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न होत नाहीत, शिक्षक अपुरे आहेत, मुख्याध्यापक नाहीत, शाळांमधील सोयी-सुविधांची दुरवस्था झाली आहे, अशा विविध कारणास्तव पालकांनी इंग्रजी शाळांना पसंती दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ४३ प्राथमिक शाळांची पटसंख्या दहापेक्षाही कमी झाली आहे. त्यात अक्‍कलकोट, करमाळा, माढ्यातील प्रत्येकी सहा शाळा, माळशिरस तालुक्‍यातील आठ, मोहोळ, पंढरपूर तालुक्‍यातील प्रत्येकी चार, सांगोल्यातील पाच तर बार्शी तालुक्‍यातील तीन आणि मंगळवेढ्यातील एका शाळेचा समावेश आहे. या शाळा पटसंख्येअभावी बंद होऊ नयेत म्हणून शिक्षणाधिकारी किरण लोहार यांचे प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक शिक्षणाची सद्यस्थिती...एकूण शाळा

२७९८

एकूण विद्यार्थी

२,०१,७९२

दहापेक्षा कमी पटसंख्या

४३

शिक्षकांची रिक्‍त पदे

७५९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com