Solapur : आष्टी कालव्याची दुरवस्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water canal

Solapur : आष्टी कालव्याची दुरवस्था

मोहोळ : आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कालव्याला दोन्ही बाजूने प्लास्टर करावे, कालव्याच्या आतील भागाचे सपाटीकरण करावे, ज्या अधिकाऱ्यांमुळे ही योजना रखडली आहे त्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, यासह अन्य मागण्यांसाठी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी न्याय मिळेपर्यंत या योजनेच्या कालव्यातच मंगळवारपासून (ता. ११) धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तशा आशियाचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १९९५ मध्ये युती शासनाच्या काळात ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे बरेचसे काम झालेही आहे. मात्र, प्रत्येक वेळी राज्यकर्त्यांनी या योजनेचे भांडवल करून तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली. विशेष म्हणजे गेली २७ वर्षे झाली ही योजना अद्यापही रखडलेलीच आहे. या योजनेच्या कालव्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना आज पावेतो या सिंचन योजनेचे पाणीही मिळाले नाही.

कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला तसेच फळबागांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत ते त्वरित द्यावेत अशा मागण्या देशमुख यांनी केल्या आहेत. या योजनेच्या जवळच असलेल्या हिवरे, वडाचीवाडी, चिखली या गावांचा या योजनेत समावेश करावा, आष्टी उपसा सिंचन योजनेत च्या टप्पा क्रमांक दोन चे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे ते काम लवकर करून खवणी, पोखरापूर, सारोळे या गावांचा दुष्काळ संपवावा, उजनी कालव्याचे पाणी सुटल्यावर ते आष्टी तलावात प्राधान्याने सोडावे, पापरी, खंडाळी येथील लघु वितरीकेची कामे अपुरी आहेत ती त्वरित पूर्ण करावीत. या मागण्यासाठी मंगळवारपासून पाटकुल येथील या कालव्यातच धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.