Solapur : बार असोसिएशनची ९ नोव्हेंबरला निवडणूक

आठ दिवसांनंतर वर्गणी भरायला प्रारंभ; इच्छुकांकडे लक्ष
Solapur
Solapursakal

सोलापूर : सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश ठोकडे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ २७ ऑक्टोबर रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे आता पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. ९ नोव्हेंबर रोजी बार असोसिएशनसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय ठरला असून, १८ ऑक्टोबरपासून सदस्य वकिलांकडून वर्गणी गोळा करण्यास प्रारंभ होणार आहे.

सोलापूर जिल्हा न्यायालयातील वकिलांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचे प्रमुख काम बार असोसिएशनतर्फे केले जाते. यापूर्वी ॲड. रजाक शेख, व्ही. एस. आळंगे, ॲड. मिलिंद थोबडे, ॲड. एल. एन. मारडकर, ॲड. संतोष न्हावकर, ॲड. बसवराज सलगर यांच्यासह अनेक अध्यक्षांनी नवोदित वकिलांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत. ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या निवडणुकीत ॲड. ठोकडे यांच्या पॅनेलने ॲड. सुरेश गायकवाड यांचा पराभव केला होता.

एक हजार ३३३ वकील सदस्यांनी या निवडणुकीत मतदान केले होते. आता महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनतर्फे आयोजित राज्य परिषद पार पडल्यानंतर वर्गणी भरण्यास सुरवात होणार आहे. वर्गणी भरणाऱ्यांनाच मतदानाचा अधिकार असतो. त्यामुळे पॅनेलप्रमुखच आपल्या समर्थक वकिलांची १०० टक्के वर्गणी भरली जावी यासाठी प्रयत्न करतील, हे निश्चित.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत रविवारी सोलापुरात

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत हे रविवारी सोलापुरात येणार असून, हुतात्मा स्मृती मंदिरात महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे यांच्या पुढाकारातून आयोजित वकिलांच्या राज्यस्तरीय परिषदेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपणकर दत्ता व न्यायाधीश पी. बी. वरळे, एम. एस. कर्णिक, पृथ्वीराज चव्हाण, एन. जे. जमादार, विनय जोशी यांच्यासह बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

सुरेश गायकवाड यांच्या विरोधात कोण?

ॲड. सुरेश गायकवाड हे ज्येष्ठ विधिज्ञ असून, मागील बार असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत आपणच अध्यक्ष होऊ, जुन्या-नव्या वकिलांचे प्रश्न (बसायला चेंबर, वाहनांसाठी पार्किंग वगैरे) सोडवू, असा विश्वास त्यांनी ‘सकाळ’च्या माध्यमातून व्यक्त केला आहे. पण, त्यांच्याविरोधात कोण, हा प्रश्न कायम आहे. ॲड. राजेंद्र फताटे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. पण, काही दिवसांत कोण कोणाविरुद्ध लढणार, हे स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com