बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड! पॅनल फताटेंचा, पण अध्यक्ष विरोधी पॅनेलचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election
बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड! पॅनल फताटेंचा, पण अध्यक्ष विरोधी पॅनेलचा

बार असोसिशनच्या अध्यक्षपदी ॲड. गायकवाड! पॅनल फताटेंचा, पण अध्यक्ष विरोधी पॅनेलचा

सोलापूर : वकिलांच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत ॲड. सुरेश गायकवाड यांनी अध्यक्षपद खेचून आणले. परंतु, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदारपदी विरोधी पॅनेलच्या उमेदवारांना यश मिळाले. ॲड. गायकवाड यांच्या पॅनेलमधील सहसचिव पदाच्या उमेदवार ॲड. अनिता रणशृंगारे यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. विधी विकास पॅनेलचे प्रमुख ॲड. राजेंद्र फताटे यांना मात्र पराभव स्वीकारावा लागला.

बार असोसिएशनसाठी शुक्रवारी (ता. ११) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण १४६७ पैकी एक हजार २१२ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सायंकाळी मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासून विधीसेवा पॅनेलचे प्रमुख ॲड. गायकवाड आघाडीवर राहिले. त्यांनी प्रत्येक फेरीत मताधिक्य मिळवत अध्यक्षपद खेचून आणले. त्यांच्या पॅनेलमधून उपाध्यक्षपदासाठी ॲड. सिद्धाराम म्हेत्रे, सचिवपदासाठी ॲड. अभिजित देशमुख, सहसचिवसाठी ॲड. अनिता रणशृंगारे आणि खजिनदार पदासाठी ॲड. अब्दुल शेख यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यातून अध्यक्ष ॲड. गायकवाड आणि सहसचिव ॲड. रणशृंगारे यांनाच विजय मिळाला. दुसरीकडे ॲड. फताटे यांच्या विधीविकास पॅनेलचे उमेदवार ॲड. आसिम बांगी हे उपाध्यक्ष झाले. तसेच ॲड. फताटे पॅनेलचे ॲड. करण भोसले हे सचिवपदी आणि खजिनदारपदी ॲड. अविनाश काळे यांनी बाजी मारली.

उमेदवारनिहाय मतांची स्थिती

  • अध्यक्ष : सुरेश गायकवाड (७००), राजेंद्र फताटे (४९०)

  • उपाध्यक्ष : आसिम बांगी (६८६), सिद्धाराम म्हेत्रे (५०८)

  • सचिव : करण भोसले (५९१), अभिजित देशमुख (३३४), लक्ष्मण पाटील (२६७)

  • खजिनदार : अविनाश काळे (३६८), विनय कटारे (३५६), अब्दुल शेख (३५१), एच. आगनूर (१३७)

  • सहसचिव : अनिता रणशृंगारे (५२८), शाहीन शेख (५१०) सुवर्णा शिंदे (१५८)

पराभूतांना क्रॉस व्होटिंग अन्‌ अपक्षांचा फटका

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीत ‘पॅनेलप्रमुख विजयी झाला, पण अन्य तिघे पराभूत झाले’ अशी स्थिती पाहायला मिळाली. विधीसेवा पॅनेलचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार ॲड. म्हेत्रे, सचिवपदाचे उमेदवार ॲड. देशमुख आणि खजिनदारपदाचे ॲड. शेख यांना पराभूत व्हावे लागले. त्या ठिकाणी विधी विकास पॅनेलचे ॲड. बांगी, ॲड. भोसले आणि ॲड. काळे यांना संधी मिळाली. दरम्यान, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच अपक्ष उमेदवारांचा देखील फटका पराभूतांना सोसावा लागला. दुसरीकडे खजिनदार पदाचे उमेदवार ॲड. काळे व अपक्ष उमेदवार ॲड. विनय कटारे यांच्यात आणि ॲड. गायकवाड यांच्या पॅनेलच्या सहसचिव पदाच्या उमेदवार ॲड. रणशृंगारे व ॲड. फताटे यांच्या पॅनेलच्या उमेदवार ॲड. शेख यांच्यात शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली.