सोलापूर : अडगळीतील ताकदवान नेत्यांवर भाजपचा ‘वॉच’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

सोलापूर : अडगळीतील ताकदवान नेत्यांवर भाजपचा ‘वॉच’!

सोलापूर : मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्‌ट्रिक आणि तीनवेळा राष्ट्रवादीने दिलेल्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यात राजन पाटलांचा मोठा वाटा आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे प्राबल्य असतानाही पक्षाने त्यांच्याकडे विशेष लक्ष न दिल्याने सध्या ताकदवान असूनही ते अडगळीत आहेत. दिलीप माने, महेश कोठे यांचीही तशीच खंत आहे. दुसरीकडे, करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे आणि ‘विठ्ठल’ कारखान्याचे नूतन चेअरमन अभिजित पाटील यांना पक्षात घेण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद वाढवून राजन पाटील व त्यांचे चिरंजीव विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी सलग ३० वर्षे वर्चस्व कायम राखले. या काळात त्यांनी मतदारसंघात भाजप व शिवसेनेला जम बसवू दिला नाही. दुसरीकडे, अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून १९९९, २००४ आणि २०१४ अशा तिन्ही वेळेस आमदार झालेले माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची ताकद आजही त्या मतदारसंघात मोठी आहे.

२००९ मध्ये त्यांना १३८५ मतांनी सिद्रामप्पा पाटलांकडून पराभव स्वीकारावा लागला. तरीपण, पुढच्यावेळी (२०१४) मध्ये म्हेत्रे यांनी त्या पराभवाचा वचपा काढून सिद्रामप्पांना पराभूत केले. मोदी लाट असतानाही ते आमदार झाले, मात्र २०१९ च्या निवडणुकीत पक्षातील वरिष्ठांकडून त्यांना म्हणावी तशी साथ मिळाली नाही.

त्याचवेळी ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा झाली आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. तसेच सोलापूर लोकसभेला सुशीलकुमार शिंदे हे केंद्रात गेल्यानंतर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप माने यांना संधी मिळाली आणि ते २००९ मध्ये आमदार झाले. पण, पुढील काळात त्यांनाही पक्षाकडून म्हणावी तशी संधी मिळाली नाही आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता पुन्हा ते दुसऱ्या पक्षात जातील, अशी चर्चा आहे.

महेश कोठेंची द्विधा मन:स्थिती

शहराच्या राजकारणात विशेषत: महापालिकेत महेश कोठेंचे मागील ३० वर्षांपासून वर्चस्व आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता येण्यात कोठेंचा मोठा वाटा राहिला आहे. अनेकदा विधान परिषदेची संधी सोलापूरला मिळाल्यानंतरही पक्षातील नेत्यांनी महेश कोठेंना त्या ठिकाणी संधी दिली नाही. आपल्याऐवजी इतरांना संधी दिल्याची खंत मनात ठेवून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊनही काहीच निधी मिळाला नाही.

पण, उपमुख्यमंत्री अजित पवार, तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून त्यांना निधी मिळाला. त्यामुळे ते समर्थक नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीत जाणार हे निश्चित झाले. मात्र, आता राज्यात सत्तांतर झाले असून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपधील वरिष्ठ नेत्यांसोबत कोठेंचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सध्या ते द्विधा मन:स्थितीत असून आता ते राष्ट्रवादी, भाजप की शिंदे गटात जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजयमामा भाजपसोबत गेल्यास नारायण पाटलांचे काय?

भाजपच्या विशेषत: माजी मंत्री सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्या मदतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय शिंदे सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार आहेत. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांशीही त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध आहेत. आगामी निवडणुकीत भाजपने स्वबळावर सत्ता मिळविण्याच्या दृष्टीने नियोजन करायला सुरवात केली आहे. त्यामुळे संजय शिंदेंनी भाजपला साथ दिल्यास ते पुन्हा तेथून आमदार होतील, अशी स्थिती आहे. पण, तेथील माजी आमदार नारायण पाटील यांना शिंदे गट कुठे संधी देणार, याची उत्सुकता आहे.

Web Title: Solapur Bjp Watch Powerful Leaders

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..